ग्लोबल मेअर्सच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश !

महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे – कोरोना संसर्गाचा सामना करत असतांना अभिनव संकल्पनांची कार्यवाही करणार्‍या शहरांसाठी ग्लोबल मेअर्स ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश झाला आहे. ब्लूमबर्ग फिलॉनथ्रोपीजच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ९९ देशांतील ६३१ शहरांनी या स्पर्धेसाठी अर्ज केले होते. त्यातील पहिल्या ५० शहरांत पुण्याचा समावेश झाला आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना या स्पर्धेत सादर केली होती. स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार आहे. यातून अंतिम निवड होणार्‍या १५ शहरांना त्यांच्या संकल्पनांची कार्यवाही करण्यासाठी तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे येथील प्रदूषणात वाढ झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा महापालिकेचा संकल्प असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.