शेरीनाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णानदीत, प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

निष्क्रीय प्रशासन ! जीवघेण्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सांगली, १८ जून (वार्ता.) – गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने शहर आणि परिसरातील सर्व नाले, गटारी या भरून वहात आहेत. हे सर्व पाणी कृष्णा नदीजवळ असलेल्या शेरीनाल्यात मिसळते. हा शेरीनाला आता थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. शेरीनाल्याच्या दूषित पाण्याने नदीचे पात्र फेसाळले असून नदीच्या पाण्यावर तवंग पसरला आहे. प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

कृष्णा नदीपात्राजवळच शेरीनाला योजनेचे ‘पंपिंग स्टेशन’ आहे. गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाणी इतके वाढले की हे ‘पंपिंग स्टेशन’च पाण्याखाली गेले. त्यामुळे उपसा बंद होऊन हे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. हे पाणी अन्यत्र नेणारी ‘धुळगाव योजना’ अद्यापही अपूर्णच असल्याने प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या उद्भवते. त्यामुळे प्रत्येक वर्षी सांगलीकरांना ऐन पावसाळ्यात अशुद्ध पाणी प्यावे लागते.