स्विस बँकांमध्ये भारतियांची २० सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा !

  • ‘स्विस नॅशनल बँके’ने घोषित केली आकडेवारी

  • काळ्या धनाशी संबंध नसल्याचे बँकेकडून स्पष्ट

स्विस बँकांमध्ये कुणी कुणी आणि कधी पैसा ठेवला आहे, हे जनतेला कळले पाहिजे ! यासाठी सरकारने त्यांची नावे घोषित करावीत, अशी जनतेची मागणी आहे !

बर्न (स्वित्झर्लंड) – स्विस बँकांमध्ये भारतियांनी जमा केलेली रक्कम २० सहस्र कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेेने १७ जूनला घोषित केलेल्या वार्षिक आकडेवारीतून उघड झाली आहे. वर्ष २०२० मध्ये भारतीय नागरिक आणि आस्थापने यांनी स्विस बँकांमध्ये अनुमाने २० सहस्र ७०० कोटी रुपये जमा केले आहेत. यांतील १३ सहस्र ५०० कोटी रुपये बाँड, सुरक्षा ठेवी आणि इतर माध्यमांद्वारे गुंतवण्यात आले आहेत.

बँकेच्या माहितीनुसार वर्ष २००६ मध्ये भारतियांच्या निधीने ६.५ अब्ज स्विस फ्रँक अशी विक्रमी पातळी गाठली होती. आता वर्ष २०२० मध्ये जमा झालेली रक्कम सर्वोच्च ठरली आहे. ही आकडेवारी अधिकृत असून या आकडेवारीचा काळ्या धनाशी संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.