कोरोनाच्या काळात असे प्रकार होणे, हे अत्यंत गंभीर असून प्रशासनाने अशा करणांमध्ये वेळीच लक्ष दिले असते, तर यातील अनेक अपप्रकार टाळता आले असते !
मिरज – येथील ‘अॅपेक्स’ रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री उपलब्ध नसणे, उपचार करण्यास बंदी आदेश असून रुग्णांवर उपचार करणे, भरमसाठ देयक आकारणी करणे यांसह अनेक त्रुटी आढळ्याने मिरज येथील ‘अॅपेक्स’ रुग्णालयाच्या डॉ. महेश जाधव यांच्यासह ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील भरत वेल्लाळ, गोकुळ राठोड, जानकिराम सावंत, राजेंद्र ढगे यांना अटक करण्यात आली आहे. यातील प्रसन्न करंजकर आणि नरेंद्र जाधव यांना यापूर्वी अटक करण्यात आली असून त्यांचा पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
१. ‘अॅपेक्स’ रुग्णालयाच्या डॉ. महेश जाधव यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त यांच्याकडे कोरोना रुग्णालय चालू करण्याची अनुमती मागितली. त्यांना १४ एप्रिल २०२१ या दिवशी कोरोना रुग्णालय चालू करण्यास अनुमती देण्यात आली.
२. यानंतर डॉ. महेश जाधव यांनी सांगली-मिरज रस्त्यावर ‘अॅपेक्स’ नावाचे रुग्णालय चालू केले. डॉ. महेश जाधव यांनी रुग्णांवर ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘ऑक्सिजन’ पुरवठा नसतांनाही उपचार केले. तज्ञ आधुनिक वैद्यांचे पथक नेमून उपचार करण्याऐवजी ‘होमिओपॅथी’ महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणार्या शिकाऊ विद्यार्थ्यांकडून उपचार करण्यात आले. (एखाद्या रुग्णालयास कोरोना रुग्णालय म्हणून अनुमती दिल्यानंतर त्याची नियमित पडताळणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते. ही पडताळणी नियमित होत असेल, तर ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘ऑक्सिजन’ पुरवठा नसतांनाही उपचार होत असल्याच्या त्रुटी महापालिका आरोग्ययंत्रणेच्या लक्षात कशा आल्या नाहीत ? – संपादक)
३. रुग्णांच्या नातेवाइकांकडून भरमसाठ देयक आकारणी करूनही त्यांना रुग्णालयातून सोडण्यास टाळाटाळ करण्यात आली. याविषयी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. (प्रत्येक देयक हे लेखापरीक्षक समितीकडून अंतिम केल्यानंतरच रुग्णांकडून त्याचे पैसे घ्यावेत, असा नियम असतांना रुग्णांकडून भरमसाठ देयके घेतले जात असतांना या लेखापरीक्षक समितीने नेमके काय केले ? तक्रार केल्यावर प्रशासनाने जलद गतीने पाऊले उचलली असती, तर पुढील अपप्रकारांना वेळीच पायबंद बसला असता ! – संपादक)
४. त्यानंतर या रुग्णालयावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घालण्यात आली. असे असूनही उपचार करण्याची घटना घडली होती. त्यामुळे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली. (कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घालण्यात आलेली असतांनाही रुग्णालयात उपचार केले जाणे हे अत्यंत गंभीर आहे ! – संपादक)
५. या प्रकरणात १५ जून या दिवशी रुग्णालयातील सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
६. या प्रकरणी ‘अॅपेक्स’ रुग्णालयाच्या डॉ. महेश जाधव यांना गुन्हा नोंद झाल्यापासून अद्याप अटक झालेली नाही. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आवेदन सादर केले आहे. (इतका गंभीर गुन्हा नोंद असतांनाही डॉ. महेश जाधव यांना अटक न होणे, हे गंभीर आहे. यासाठी प्रशासनातील कुणी सहकार्य करत आहे का ?, असा प्रश्न नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)
‘अॅपेक्स’ रुग्णालयाची नोंदणी रहित होणे आणि कर्मचार्यांना अटक होणे पुरेसे नसून आधुनिक वैद्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे ! – दीपक माने, संघटन सरचिटणीस, भाजपया प्रकरणी भाजपचे संघटन सरचिटणीस श्री. दीपक माने म्हणाले, ‘‘हे प्रकरण अत्यंत गंभीर असून ‘अॅपेक्स’ रुग्णालयात अनेक रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ‘अॅपेक्स’ची नोंदणी रहित होणे, तेथील कर्मचार्यांना अटक होणे पुरेसे नसून रुग्णालयातील आधुनिक वैद्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. या मागणीसाठी गेल्याच आठवड्यात आम्ही प्रशासन आणि पोलीस यांना निवेदनही दिले आहे; मात्र तसा गुन्हा अद्याप नोंद झालेला नाही. हे प्रकरण तडीस जाईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू.’’ |