सातारा, १७ जून (वार्ता.) – सर्व राजकीय नेत्यांच्या तोंडी मराठा असले, तरी मराठ्यांच्या हाती खराटाच आहे. सरकारने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिली आहे.
खासदार भोसले यांनी पत्रात म्हटले आहे की, आरक्षणाविषयी ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही. इतर समाजासोबत मराठा समाजालाही आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आतापर्यंत मराठ्यांचा संयम पाहिला आहे. उद्रेक कोणीही पाहू नये. सरकारने विनाविलंब ५ जुलैपूर्वी सर्व मागण्या मान्य असल्याचे जाहीर करावे.