नागरिकांनी वनविभागाच्या कार्यालयात ठेवला मृतदेह !
चंद्रपूर – जिल्ह्यातील मुधोली या गावातील चेतन जीवतोडे (वय १६ वर्षे) याला विषारी नागाने चावा घेतला; मात्र ताडोबातील बफर क्षेत्रात लावलेल्या गतिरोधकांमुळे त्याला वेळेवर रुग्णालयात नेता आले नाही. त्यामुळे चेतन याचा मृत्यू झाला, असा आरोप गावकर्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मुलाचा मृतदेह थेट वनविभागाच्या कार्यालयात आणला. यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (गतीरोधकांमुळे गावकर्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास होत असतांना प्रशासन झोपले आहे का ? गावकर्यांनी तक्रार करूनही शासन उपाययोजना का काढत नाही ? सर्पदंशाने मुलाचा मृत्यू झाला, आता त्याचे दायित्व वनविभाग घेणार आहे का ? – संपादक)
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पद्मापूरपासून, तर मोहुर्ली कोअर क्षेत्राच्या प्रवेशद्वारापर्यंत ६३ गतीरोधक उभारण्यात आले आहेत. यापूर्वी या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्या वाहनांनी अनेक वन्यजिवांचा नाहक बळी गेला. त्यावर तोडगा काढण्यासाठी हे गतीरोधक उभारण्यात आले आहेत; मात्र यामुळे तेथील गावकर्यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे, अशी त्यांची तक्रार आहे. ‘याच गतीरोधकांमुळे मुधोली या गावातील महिला सरपंचाचा गर्भपात झाला, तर एका महिलेचा अपघात झाल्याने ती गंभीर घायाळ झाली’, असे गावकर्यांनी सांगितले. असे घडूनही यावर कुठलाही तोडगा निघाला नाही.