आज आणि उद्या जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणजवळील नडगिवे घाटात दरड कोसळली, तसेच वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा आणि करूळ या घाटांतही दरड कोसळली. प्रशासनाने या तीनही मार्गांवरील दरड हटवून वाहतूक पूर्ववत् केली आहे.
वैभववाडी – पावसामुळे १३ जूनला सकाळी करूळ घाटात, तर दुपारी भुईबावडा घाटात दरड कोसळली. अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर घाटांची पहाणी करण्यासाठी आलेले राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक यांनी भुईबावडा घाटातील दरड बाजूला केली. करूळ घाटातील दरड पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून मार्ग मोकळा केला. त्यामुळे या घाटांतील वाहतूक पूर्ववत् झाली. या वेळी तहसीलदार रामदास झळके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कणकवली – पावसामुळे १२ जूनला रात्री मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे घाटात दरड कोसळली. त्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणार्या ठेकेदाराने त्याच्याकडील यंत्रणेद्वारे ही दरड हटवून मार्ग मोकळा केला. असे असले, तरी मार्गावर चिखल पसरल्याने एकेरी वाहतूक चालू आहे.
वेंगुर्ला – अतीवृष्टीच्या पाश्वभूमीवर वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने नवाबाग येथील मांडवी खाडीत ‘आपत्कालीन स्थिती’चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी पोलिसांनी ‘अतीवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी’, असे आवाहन केले.
पर्यटनाला बंदी असतांना आंबोली येथे आलेल्या १५ पर्यटकांवर गुन्हा नोंद
सावंतवाडी – तालुक्यातील आंबोलीसह जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत आंबोली पर्यटन स्थळावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतांना १३ जूनला या ठिकाणी आलेल्या १५ पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’
रत्नागिरी – गेल्या २ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत १४ आणि १५ जून हे २ दिवस ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. कोकण किनारपट्टीवर अतीवृष्टीची चेतावणी वेधशाळेने दिली होती. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील गावांना सावधानतेची चेतावणी देण्यात आली आहे.