विशाळगडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवा !

कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांची मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे मागणी

विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांची समाधीस्थळे

कोल्हापूर, १३ जून (वार्ता.) – विशाळगडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, तसेच नरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांची समाधीस्थळे अन् गडावरील मंदिरे यांचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील १२५ हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘ई-मेल’ पाठवण्यात आला आहे.

एकीकडे राज्य सरकारने गडकोट संवर्धन मोहीम हाती घेतली आहे, दुसरीकडे विशाळगडाकडे मात्र पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे अत्यंत गंभीर असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे, असे या ‘ई-मेल’मध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या मागण्या

  • सरकारने विशाळगडावरील अतिक्रमण तात्काळ हटवून त्याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.
  • बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळी ‘पन्हाळगड ते विशाळगड रणसंग्रामा’वर आधारित भव्य स्मारक उभे करावे.
  • गडावरील ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरे यांचा जीर्णोद्धार करावा.
  • विशाळगडाचे ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांना समजण्यासाठी किल्ल्यावर असणारी सर्व मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळे यांची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात यावेत.
  • किल्ल्याचे पावित्र्य भंग करणारे प्रकार (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानीकारक सर्व गोष्टी यांना प्रतिबंध करावा.