दंड थकवणार्‍यांच्या घरी जाऊन पोलीस दंड वसूल करणार !

जनतेला शिस्त नसल्याचा हा परिणाम !

मुंबई – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दंड आकारूनही ते तो भरत नसल्याने आता पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन दंड वसूल करणार आहेत. ४०० कोटी रुपयांचा दंड थकला असून तो वसूल करण्याची मोहीम १४ जूनपासून हाती घेण्यात येणार आहे.

१. प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेले वाहन मालकांचे तपशील अपुरे असल्याने ई चलन जारी झाले, तरी त्याची बजावणी होत नाही. त्यामुळे ई चलनांचा धाक निर्माण होऊ शकलेला नाही.

२. या सर्वांचा परिणाम दंड भरण्याकडे वाहन मालक दुर्लक्ष करतात किंवा ई चलन प्राप्त झाले तरी ते गांभीर्याने घेत नाहीत.

३. वाहतूक पोलिसांनी एक कॉल सेंटर चालू करून दंड थकवणार्‍यांना संपर्क केला. त्यांना शिल्लक रक्कम किती, ती कशी भरावी, न भरल्यास काय परिणाम होतील, याची माहिती देण्यात येत आहे. गेल्या ३ मासांत या कॉल सेंटरने १४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता उर्वरित ४०० कोटी रुपयांच्या दंड वसुलीसाठी घरोघरी भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे.