(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांचे पाकिस्तानला आश्‍वासन !

  • काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्‍वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !
  • काँग्रेस पुन्हा कधीही केंद्रात सत्तेत येऊ शकणार नाही, हे वास्तव काँग्रेस कधी स्वीकारणार ?
काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह

नवी देहली – जेव्हा काश्मीरचे कलम ३७० हटवले गेले, तेव्हा तेथे लोकशाही नव्हती. तेथे मानवताही नव्हती; कारण सर्वांनाच कारागृहात डांबण्यात आले होते. पूर्वी या मुसलमानबहुल राज्याचा राजा हिंदु होता आणि दोघेही एकत्र काम करत होते. एवढेच नाही, तर काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंना सरकारी नोकरीत आरक्षणही देण्यात आले होते. अशात कलम ३७० हटवण्याचा निर्णय अत्यंत वाईट होता. जेव्हा भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, तेव्हा कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल, असे आश्‍वासन काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पाकमधील पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत दिले. या मुलाखतीचा एक ऑडिओ भाजपच्या ‘आयटी सेल’चे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रसारित केला आहे.

दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांचाच संदेश पाकपर्यंत पोचवला ! – भाजप

दिग्विजय सिंह यांच्या या विधानावर भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्वीट करत म्हटले की, पाकिस्तान हे काँग्रेसचे पहिले प्रेम आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांचाच संदेश पाकपर्यंत पोचवला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकचे साहाय्य करील.