‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हानीची केंद्रीय पथकाकडून पहाणी

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक कोकण दौर्‍यावर आले होते. या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, आणि वेंगुर्ला येथील किनारपट्टीची पहाणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यात वादळामुळे झालेल्या हानीची हवाई पहाणी करून गुजरातसाठी १ सहस्र कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ घोषित केले आहे. आता केंद्रीय पथकाने ३ जूनपासून कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची पहाणी केल्यानंतर महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकार किती साहाय्य देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांची पडताळणी करण्यासाठी हा दौरा होता, असे पथकाचे प्रमुख अशोक परमार यांनी तारकर्ली (तालुका मालवण) येथे पत्रकारांना सांगितले.

या पथकाने मालवण शहर, वायरी, तारकर्ली आणि वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग येथे भेट देऊन हानीची पहाणी केली. या पथकात केंद्रीय अर्थ विभागाचे अभय कुमार, केंद्रीय कृषी विभागाचे सिंह, केंद्रीय ऊर्जा विभागाचे जे.के. राठोड यांच्यासह स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या पथकाला जिल्हा पोलिसांचे मोठे संरक्षण देण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली ४० पोलीस कर्मचारी या पथकाच्या सुरक्षेसाठी होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या पथकाच्या संपर्कात येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रथम ‘कोरोना रॅपिड टेस्ट’ करण्यात आली होती.