परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात देवद (पनवेल) येथील श्री. प्रमोद बेंद्रे यांनी अनुभवलेले भावक्षण !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर आनंद होणे आणि ‘प्रथम भेटीतच त्यांच्याशी आधीपासून ओळख आहे’, असे वाटणे

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘मी शाळेत शिकत असतांना माझी मोठी बहीण सौ. शर्मिला बांगर (पूर्वाश्रमीची कु. शर्मिला बेंद्रे) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात जात असे. एकदा ती मला मुंबई येथील सेवाकेंद्रात घेऊन गेली. ताईने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘हा माझा लहान भाऊ आहे.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्यासाठी चहा आणि अल्पाहार आणला. त्यांना पाहून मला आनंद झाला. ‘त्यांची आणि माझी आधीपासूनच ओळख आहे’, असे मला वाटले. त्यांना पाहिल्यावर माझे मन शांत झाले. त्यांनी मला विचारले, ‘‘काय करतोस ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मी शिकत आहे.’’ त्यानंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘इथे मधून मधून सेवेला येत जा.’’ त्यावर मी ‘ठीक आहे’, असे म्हणालो. नंतर त्यांनी मला सेवाकेंद्र दाखवले. त्यांनी श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) आणि श्री. दिनेश शिंदे यांच्याशी माझी ओळख करून दिली.

२. मुंबई येथील सेवाकेंद्रात जाऊ लागणे  

​त्यानंतर मी सेवाकेंद्रात सेवेसाठी जाऊ लागलो. मी सेवाकेंद्रात गेल्यावर मला वेगळाच आनंद मिळत होता. त्या वेळी माझे मित्र मला म्हणायचे, ‘‘डॉक्टरांनी तुला संमोहित केले आहे; म्हणून तू त्यांच्याकडे सेवेला जात आहेस.’’ आमच्या घरची परिस्थिती चांगली नसतांनाही आई-बाबांनी मला कधीच साधना करण्यापासून अडवले नाही.

२ अ. ध्वनीचकत्या आणून देण्याच्या सेवेतून मिळालेले सवलतीचे (कमिशनचे) पैसे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला स्वतःकडेच ठेवायला सांगणे आणि त्या पैशांमधून घेतलेली सोन्याची साखळी अजूनही साधकाजवळ असणे : मी ध्वनीचकत्या आणून देण्याची सेवा करत होतो. मला एका ध्वनीचकतीमागे १० पैसे सवलत (कमिशन) मिळत होते. मी काही मासांनी ते पैसे मोजल्यावर ‘पुष्कळ पैसे जमा झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले. मी ते पैसे घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेलो. मी त्यांना सांगितले, ‘‘मला ध्वनीचकत्यांच्या खरेदीतून हे पैसे मिळाले आहेत. ते तुम्ही घ्या.’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘ते तुला मिळाले आहेत. तुलाच ठेव.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘मला नको. हे सेवाकेंद्राचे पैसे आहेत.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुझ्या आईकडे नेऊन दे.’’ मी आईकडे पैसे दिले. तेव्हा आई मला म्हणाली, ‘‘हे देवाचे पैसे आहेत. देवालाच नेऊन दे.’’ मी पुन्हा परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना सांगितले, ‘‘आई पैसे घेत नाही. तुम्ही घ्या’’; मात्र त्यांनी ते पैसे घेतले नाहीत. मी त्या पैशांतून सोन्याची साखळी घेतली. मी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, ‘‘सनातन संस्थेला जेव्हा पैशांची आवश्यकता असेल, तेव्हा मी ही सोन्याची साखळी विकीन.’’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या आशीर्वादाने माझ्याकडे ती सोन्याची साखळी अजूनही आहे.

२ आ. वाहन चालवण्याचा अनुज्ञप्ती परवाना (लायसन्स) काढण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साहाय्य करणे : एकदा दिनेशदादा रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मला सेवाकेंद्रातून घरी सोडण्यासाठी आले होते. मी आणि दादा दुचाकीवरून गेलो होतो. दुसर्‍या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले, ‘‘वाहन प्रशिक्षण केंद्रात जा आणि चारचाकी चालवण्याचा अनुज्ञप्ती परवाना घेऊन आल्यावर तू मला चारचाकीतून फिरव.’’ परवाना काढण्यासाठी आवश्यक ते साहाय्य त्यांनी मला केले. त्यानंतर मी वाहन प्रशिक्षण केंद्रात जाऊन चारचाकी चालवायला शिकलो. मला चारचाकी चालवण्याचा अनुज्ञप्ती परवाना मिळाल्यावर मी तो परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवला. त्यांनी लगेच मला सांगितले, ‘‘आपल्या चारचाकीतून आपण फिरायला जाऊया.’’ त्यानंतर मी आणि परात्पर गुरु डॉक्टर लगेच फिरायला गेलो.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– श्री. प्रमोद बेंद्रे, सनातन संकुल, देवद, पनवेल. (९.३.२०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक