माणगंगा नदीपात्रातील ८०० वर्षांपूर्वीच्या स्नानकुंडाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

‘माणरत्न सोशल फाऊंडेशन’कडून जीर्णाेद्धाराची मागणी

  • अशी मागणी अन्य संघटनांना का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून त्याकडे लक्ष का देत नाही ?
  • स्नानकुंडातील पवित्र तिर्थाचे आध्यात्मिक स्तरावर अनेक लाभ आहेत. तीर्थाचा भाविकांना लाभ होण्यासाठी प्रशासनाने त्याचा जीर्णाेद्धार लवकर करावा, ही अपेक्षा ! संघटनांनी जीर्णाेद्धार होईपर्यंत पाठपुरावा करावा !
माणगंगा नदीपात्रातील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचे भग्न झालेले स्नानकुंड तीर्थ

सातारा – महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले म्हसवड (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवस्थानच्या माणगंगा नदीपात्रात ८०० वर्षे पुरातन तीर्थ स्नानकुंड आहे. या कुंडाची पडझड झाली आहे. याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे म्हसवड नगरपालिकेने तीर्थक्षेत्र विकासनिधीतून बांधकाम करून जीर्णाेद्धार करावा, अशी मागणी ‘माणरत्न सोशल फाऊंडेशन’च्या वतीने पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, माणगंगा नदीतील पुरातन स्नानकुंड हे तीर्थक्षेत्र असून हे ठिकाण ‘श्रीं’चे तीर्थ म्हणून परिचित आहे. दर्शनासाठी येणारे भाविक माणगंगा नदीतील या कुंडामध्ये स्नान करून ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी स्नानकुंड भग्न झाले आहे. तसेच याठिकाणी घाण आणि दुर्गंधी यांचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी बंधारे बांधल्यामुळे नदीपात्रात कुंडस्थळी हात-पाय धुण्याएवढेही पाणी नसते. कुंडाभोवती गाळ साचून कुंड बुजून जाण्याच्या स्थितीत आहे. या कुंडातील गाळ काढून त्याची स्वच्छता करून ते पुन्हा भाविकांसाठी खुले करावे.