पुरोगामी विचारसरणीमुळे भारतातील कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे ! सामाजिक माध्यमांतून प्रेमसंबंध बनवणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे हे समाज रसातळाला गेल्याचे लक्षण आहे !
पणजी, ४ जून (वार्ता.) – सामाजिक प्रसारमाध्यमे, ‘डेटिंग साईट्स’ (प्रेमसंबंध वाढवण्याच्या दृष्टीने इंटरनेटद्वारे संभाषण करण्याची सुविधा असलेली संकेतस्थळे) आदींच्या प्रभावामुळे नवीन दांपत्यांमध्ये विवाहबाह्यसंबंध ठेवण्याचा वाढता कल दिसत आहे. यामुळे नवीन दांपत्यांमध्ये घटस्फोट होण्याचे प्रकार वाढत असल्याचे आढळून येत आहे, असे प्रतिपादन गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विद्या सतरकर यांनी केले आहे. गोव्यात गेल्या ५ वर्षांमध्ये घटस्फोटाची वाढती प्रकरणे घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्षा विद्या सतरकर यांनी हे प्रतिपादन केले. अध्यक्षा सौ. विद्या सतरकर यांनी मांडलेली अन्य महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे.
१. विभक्त कुटुंबपद्धतीचा उदय, पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा, महिला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वावलंबी होणे, भ्रमणभाष आणि सामाजिक माध्यमे (सोशल मिडिया) यांचा वापर यांमुळे घटस्फोट होत आहेत.
२. अलीकडे समाजात विवाहाच्या उपयुक्ततेविषयीची जाणीव झपाट्याने घटत आहे. युवावर्गाचा विवाहाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटत आहे.
३. गोव्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या ११० प्रकरणांमध्ये ९० प्रकरणे ‘फेसबूक’ किंवा इतर सामाजिक माध्यमे यांच्या वापरांमुळे झाली आहेत. सामाजिक माध्यमांच्या वापरामुळे अप्रामाणिकपणा, इतरांचा द्वेष करणे, विवाहबाह्य संंबंध ठेवणे आदी प्रकार घडत आहेत आणि याचा शेवट घटस्फोटामध्ये होत आहे.
४. युवावर्गाला सामाजिक माध्यमांचे व्यसन जडले आहे आणि हे वैवाहिक संबंध नष्ट होण्यास घातक ठरत आहे. दांपत्ये एकमेकांना प्रत्यक्ष वेळ देण्याऐवजी ‘व्हर्च्युअल’ (संगणकीय) पद्धतीने संबंध ठेवण्यास अधिक वेळ देतात. पती किंवा पत्नी यांनी एकमेकांच्या सामाजिक माध्यमांवरील संभाषण पाहून आक्षेपार्ह संवाद दिसून आल्यास दोघांमध्ये भांडणे होतात.
५. पूर्वी हुंडा, भूमीच्या मालकीचे वाद आणि कुटुंबांतील वाद यांमुळे दाम्पत्यांमध्ये घटस्फोट होत असे; मात्र आता पती किंवा पत्नी यांच्यामध्ये ‘एकमेकांकडून अपेक्षा करणे’ यावरून मतभेद निर्माण झाल्यास किंवा पती अन् पत्नी यांचे वागणे एकमेकांना पसंत नसल्यास घटस्फोट होतात.
६. या पार्श्वभूमीवर विवाहापूर्वी दोघांचे समुपदेशन होणे आवश्यक वाटते.
७. गोव्यात वर्ष २०१५ मध्ये २४६, वर्ष २०१६ मध्ये २७८, वर्ष २०१७ मध्ये १८२, वर्ष २०१९ मध्ये २८१, वर्ष २०२० मध्ये ३१५ आणि चालू वर्षी ३१ मेपर्यंत १०८ दांपत्यांनी घटस्फोट घेतला आहे.