माझी लढाई अ‍ॅलोपॅथीमधील माफियांच्या विरोधात ! – योगऋषी रामदेवबाबा

अ‍ॅलोपॅथीविषयीचा वाद संपवू इच्छित असल्याचे प्रतिपादन

हरिद्वार (उत्तराखंड) – मी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टर यांच्या विरोधात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरोधात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र आमचा या क्षेत्रातील  माफियांना विरोध आहे. ते २ रुपयांचे औषध २ सहस्र रुपयांना विकत आहेत. तसेच आवश्यकता नसतांना शस्त्रकर्म आणि चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. औषधांचा धंदा करत आहेत. आम्ही अ‍ॅलोपॅथीविषयीचा हा वाद संपवू इच्छित आहे, असे ट्वीट योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे. योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथीविषयी विधाने केल्याने इंडियन मेडीकल असोसिएशनने त्यांचा विरोध केला होता. त्यानंतर योगऋषी रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारावरून २५ प्रश्‍नही उपस्थित केले होते.
योगऋषी रामदेवबाबा यांनी पुढे म्हटले आहे की, जर अ‍ॅलोपॅथीत शस्त्रकर्म आणि जीव वाचवण्यासाठी औषधे आहेत, तर ९८ टक्के आजारांपासून बरे होण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांचा पर्याय उपलब्ध आहे. योग आणि आयुर्वेद यांना स्युडो सायन्स (छद्म विज्ञान) आणि अल्टरनेटिव थेरपी (वैकल्पिक उपचार) म्हणणे ही त्यांची खिल्ली उडवण्यासारखे आहे. ही मानसिकता देश सहन करणार नाही.