मंगळ ग्रहाचा २ जून २०२१ या दिवशी होणारा कर्क राशीत प्रवेश आणि त्या कालावधीत होणारे परिणाम

‘बुधवार, २.६.२०२१ (वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी) या दिवशी सकाळी ६.५१ वाजता मंगळ हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (कर्क राशीतील मंगळ अशुभ (नीच राशीत) मानला आहे.) मंगळ हा ग्रह एका राशीत दीड मास रहातो. या दीड मासातील पहिल्या आठ दिवसांमध्ये अधिक परिणामकारक फळ मिळते. २ जूनपासून २० जुलै २०२१ पर्यंत मंगळ ग्रह कर्क राशीत असणार आहे. २० जुलै २०२१ या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी मंगळ ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

१. कर्क राशीतील मंगळ ग्रहाला अशुभ (नीच राशीत) मानण्याचे कारण

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा नीच राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यासंबंधी अशुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. कर्क रास ही जलतत्त्वाची रास आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. कर्क राशीत प्रेम, सहानुभूती, संवेदनशीलता, चंचलता आणि भावनाप्रधानता हे गुणधर्म आढळतात. मंगळ ग्रह अग्नितत्त्वाचा आणि पुरुषकारक ग्रह आहे. मंगळ ग्रहाला त्याचे ‘पराक्रम, अन्यायाची चीड, शिस्तप्रिय, धाडसी आणि धैर्य’, हे उग्र गुणधर्म प्रगट करण्यास कर्क राशीत वाव मिळत नाही. त्यामुळे कर्क राशीत मंगळ ग्रह अशुभ मानले आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

२. राशीपरत्वे मंगळ ग्रहाची स्थाने

कर्क राशीत प्रवेश केलेला मंगळ कर्क राशीला पहिला, मिथुन राशीला दुसरा, वृषभ राशीला तिसरा, मेष राशीला चौथा, मीन राशीला पाचवा, कुंभ राशीला सहावा, मकर राशीला सातवा, धनु राशीला आठवा, वृश्चिक राशीला नववा, तूळ राशीला दहावा, कन्या राशीला अकरावा आणि सिंह राशीला बारावा आहे.

३. मंगळ ग्रहाचे महत्त्व

मंगळ हा ग्रह सूर्यमालेमध्ये पृथ्वीच्या बाहेर असलेला पहिलाच ग्रह आहे; म्हणून त्याला ‘बहिर्ग्रह’ म्हणतात. तो सूर्याच्या जवळ असल्याने त्याला सूर्याची शक्ती आणि तेज मिळते. मंगळ हा सूर्यमालेपासून ४ कोटी ८० लक्ष मैल दूर आहे. मंगळ हा पुरुष ग्रह असून तो रंगाने लाल आणि तांबूस आहे. तो नैसर्गिक अतीपापग्रह आहे. मंगळ हा अग्नितत्त्वाचा कारक असून वर्णाने क्षत्रिय आहे. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. पराक्रम, शूर, धाडसी, उत्तम नेतृत्व आणि कर्तबगारपणा हे मंगळाचे गुणधर्म आहेत.

४. कर्क राशीतील मंगळ ग्रहाचे होणारे परिणाम

मंगळ ग्रह शौर्य, पराक्रम, घरदार, जमीनजुमला, शेती, अधिकारपद, शक्ती आणि कर्तबगारपणा यांचा कारक आहे. मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्यावर मंगळ ग्रहाच्या कारकत्वाशी संबंधित अशुभ फले मिळण्याची शक्यता असते. या कालावधीत नूतन वास्तू किंवा भूमी यांचे व्यवहार करणे टाळावे.

४ अ. शारीरिक त्रास : शरिरामध्ये मंगळाचा अंमल रक्तावर असतो. त्यामुळे रक्तासंबंधी विकार उद्भवतात; रोगप्रतिकारशक्ती, तसेच प्राणशक्ती न्यून होते, स्त्रियांचे आजार वाढतात अन् उष्णतेचे विकार होतात, उदा. ताप येणे, फोड येणे, तोंड येणे, डोकेदुखी, पित्त इत्यादी. मंगळ हा ग्रह स्फोटक आणि दाहक असल्याने भाजणे, कापणे, विजेचा धक्का बसणे, वाहन अपघात होण्याची शक्यता असते.

४ आ. मानसिक त्रास : आपापसांत मतभेद आणि संघर्ष होण्याची शक्यता असते. स्वभावदोषांचे प्रमाण वाढते, उदा. राग येणे, उदास वाटणे, तीव्र स्वरूपाचे नकारात्मक आणि निराशेचे विचार येणे, वासनेचे विचार वाढणे, उतावीळपणा, विसराळूपणा, स्वतःच्या मतावर ठाम रहाणे इत्यादी.

४ इ. आध्यात्मिक परिणाम

१. साधनेपेक्षा मायेतील विचारांचे प्रमाण वाढणे

२. साधनेच्या प्रयत्नांतील सातत्य उणावण

५. मंगळ ग्रहाच्या कर्क राशीतील भ्रमण कालावधीत करावयाची साधना

५ अ. मंगळ ग्रहाची पीडापरिहारक दाने : सुवर्ण, तांबे, पोवळे, मसुर डाळ, गूळ, लाल वस्त्र, लाल फुले.

५ आ. मंगळाचा पौराण मंत्र

धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं तं मङ्गलं प्रणमाम्यहम् ।।
– नवग्रहस्तोत्र, श्लोक ३

अर्थ : धरणीच्या पोटातून जन्म घेतलेल्या, विजेसारखी तेजस्वी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

जपसंख्या : १०,०००’

(संदर्भ : दाते पंचांग)

६. ग्रहांच्या अशुभ स्थितीत साधनेचे महत्त्व

गोचर कुंडलीतील (चालू ग्रहमानावर आधारित कुंडलीतील) ग्रह अशुभ स्थितीत असेल, तर साधना न करणार्‍या व्यक्तीला अधिक त्रास होण्याचा संभव असतो. याउलट साधना करणार्‍या व्यक्तीला सात्त्विकतेमुळे ग्रहांच्या होणार्‍या अशुभ परिणामांचा फारसा त्रास होत नाही. या कालावधीत अधिकच त्रास होत असेल, तर ‘ॐ गं गणपतये नम: ।’ हा नामजप करावा किंवा वर दिलेला मंगळाचा पौराण मंत्र म्हणू शकतो.

अध्यात्मातील एक वैशिष्ट्य असे आहे की, अनुकूल काळापेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते. त्यामुळे साधकांनी अशुभ ग्रहस्थितीचा मनावर परिणाम करून न घेता साधनेचे प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याकडे लक्ष द्यावे. या कालावधीत साधकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने अन् श्रद्धेने राबवल्यास अधिक लाभ होऊ शकतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.
(३०.५.२०२१)