राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ ही मोहीम राबवणार
मुंबई – राज्यात आपण दुसर्या लाटेवर नियंत्रण आणत आहोत; मात्र काही जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दळणवळण बंदीचे निर्बंध १५ जूनपर्यंत वाढवत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० मे या दिवशी जनतेशी संवाद साधतांना केली. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ ही मोहीम राबवण्याची, तसेच कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे दायित्व शासन घेणार असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
१. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्केपर्यंत वाढले आहे, मृत्यूदर अल्प झाला आहे, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. शहरी भागांत रुग्णांची संख्या अल्प होत असतांना ग्रामीण भागात मात्र रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे, ही थोडी काळजीची गोष्ट आहे.
२. दहावीच्या परीक्षेसाठी आपण मूल्यांकन केले आहे. त्याप्रमाणे १२ वीच्या परीक्षेविषयीही आपण आढावा घेत आहोत. लवकरच याविषयीचे धोरण निश्चित करू. ज्या परीक्षेचा भवितव्यावर परिणाम होतो, त्याविषयी देशपातळीवर केंद्र सरकारने एकसमान धोरण निश्चित करायला हवे. शिक्षणाविषयी काही क्रांतीकारी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. याविषयी नवीन योजना सिद्ध करत आहोत.