चित्रपट निर्माते संदीप सिंह यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा !

चित्रपट निर्माते संदीप सिंह यांचा स्तुत्य प्रयत्न !

मुंबई – क्रांतीकारकांचे मुकुटमणी म्हणून ओळख असलेले हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीच्या निमित्ताने चित्रपट निर्माते संदीप सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पहिले ‘पोस्टर’ (भित्तीपत्रक) त्यांनी ‘इन्स्टाग्राम’वरून प्रसारित केले आहे. त्यामध्ये ‘स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणे अद्याप शिल्लक आहे. वीर सावरकर यांना लवकरच भेटा’, असे लिहिले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ऋषि वीरमानी आणि महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत, याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

या चित्रपटाविषयी संदीप सिंह म्हणाले, ‘‘एकीकडे सावकर यांचा आदर केला जातो, तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटते की, त्यांच्याविषयी लोकांना फारसे ठाऊक नसल्याने असे होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वाचा भाग होते, ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.’’