चिखली (तालुका संगमनेर, जिल्हा नगर) येथे वडिलांचा सांभाळ कुणी करायचा ? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचीच हत्या केली. कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन राहिल्या नाहीत; परंतु हा वाद हत्या करण्यापर्यंत गेला, हे अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारेच आहे. ‘मी आणि माझी मुले’, माझे करिअर, अशा विचारांमुळे मुलांना आई-वडिलांची अडगळ वाटते. ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिले, ज्यांनी अनेक हालअपेष्टा सोसून आपणाला लहानाचे मोठे केले आणि ज्या वेळी त्यांना मुलांनी सांभाळायची आवश्यकता आहे, तेव्हाच मुले त्यांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत, असे सध्याचे चित्र आहे. असे वागणे, हे मुलांसाठी लाजिरवाणे आहे. आपली महान हिंदु संस्कृती ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ (आई-वडिलांना देव मानावे) अशी शिकवण देणारी आहे. वडिलांचे वचन आणि माता कैकेयीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी १४ वर्षांचा वनवास पत्करणारे प्रभु श्रीराम, आपल्या अंध आई-वडिलांची न थकता सेवा करणारा श्रावणबाळ, आई-वडिलांच्या सेवेत खंड पडावयास नको म्हणून विठ्ठलाला प्रतीक्षा करायला लावणारा भक्त पुंडलिक असे महान आदर्श आपल्या देशात होऊन गेले. अशा देशामध्ये मुलांना आई-वडिलांना सांभाळणे कठीण वाटणे, हे अतिशय दुर्दैवी आणि संकुचितपणाची परिसीमाच आहे.
धर्मनिरपेक्ष प्रणाली आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण याचा हा परिणाम आहे. यामुळे शहरांसमवेत ग्रामीण भागातही वाढत चाललेले वृद्धाश्रम हे समाज आणि संस्कृती यांच्या अधःपतनाचे टोक आहे. मुलांना उच्चशिक्षण देण्यासह सुसंस्कार देणेही आवश्यक आहे, हे या उदाहरणातून पालकांच्या मनावर बिंबणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणानेच सुसंस्कार मिळू शकतात. प्रत्येक हिंदूने ‘आपली मुले आदर्श होण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण कसे मिळेल ?’, याकडे लक्ष द्यायला हवे. एकीकडे विदेशी लोक भारतीय संस्कृतीचे आचरण करत आहेत, तर दुसरीकडे आपण आपल्या महान संस्कृतीला झटकत आहोत, हे दिव्याखाली अंधार असल्याचेच लक्षण आहे. मुले सुसंस्कारित झाल्यास वृद्धाश्रमांची आवश्यकताच लागणार नाही, तसेच हिंदु राष्ट्रात वृद्धाश्रम नसतील, हे नक्की !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे