पुणे – वाहतुकीचा परवाना आणि कागदपत्रे नसतांना तसेच सीमाशुल्क विभागाची अनुमती न घेता परदेशी प्राण्याची तस्करी करणार्या तरुणकुमार मोहन आणि श्रीनिवास कमल या दोघांना लोहमार्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. ‘चेन्नई एल्.टी.टी. एक्सप्रेस’मध्ये दोन्ही आरोपी ६ बॅग घेऊन प्रवास करीत होते. पुणे ते लोणावळा या दरम्यान मार्ग पोलिसांनी त्यांना संशयावरून कह्यात घेतले असता त्यांच्याकडून २७९ कासव, १ सहस्र २०७ इग्वाना आणि २३० फायटर मासे जप्त करण्यात आले आहेत.
हे दोघेही मासे पार्सल करण्याचे काम करतात. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी सीमा शुल्क विभागाच्या कह्यात देण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत ते हे सर्व प्राणी चेन्नई येथून मुंबईला घेऊन जाणार असल्याचे उघड झाले. यातील काही प्राणी विदेशी असल्याने ते सीमाशुल्क विभागाच्या कह्यात देण्यात आले आहेत.