बंगालमध्ये भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था यांची कसोटी ! – जगदीप धनखड, राज्यपाल, बंगाल

बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

कोलकाता – बंगालमध्ये भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था यांची कसोटी आहे. मी पोलीस आणि प्रशासन यांच्यासह सर्वांना चेतावणी देऊ इच्छितो की, त्यांनी काही चुकीचे केले, तर परिणाम वाईट होतील. कायद्याचा फास त्यांच्यापर्यंत पोचला आहे, असे ठाम प्रतिपादन बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केले.

बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यात अनेक हिंदूंना मारण्यात आले, सहस्रो हिंदू घायाळ झाले, तसेच महिलांवरही अत्याचार करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर बंगालचे राज्यपाल धनकड यांनी बंगालमधील हिंसाचार झालेल्या क्षेत्राचा दौरा केला आणि पीडित हिंदूंच्या भेटी घेतल्या. याविषयी माध्यमांशी बोलतांना धनकड म्हणाले की,

१. आजचा दिवस माझ्या जीवनात आला नसता, तर अधिक चांगले झाले असते. या लोकांवर जो अत्याचार झाला आहे, ते ऐकण्यापेक्षा मृत्यू येण्याचा पर्याय माझ्यासमोर असता, तर मी त्याचाही विचार केला असता.

२. स्वातंत्र्यानंतर निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच हिंसाचार झाला. त्यामुळे लाखोंच्या संख्येने लोकांनी घरदार सोडले. त्यांची घरे बॉम्बने उडवून देण्यात आली, त्यांच्या घरांना आग लावण्यात आली. नंदीग्राममधील १०० हून अधिक दुकाने निवडून उद्ध्वस्त करण्यात आली.

३. भविष्यात अशी आतंकवादी आणि दायित्वशून्य व्यवस्था असेल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील कल्पना केली नसती.

पोलिसांत तक्रार केली, तर आम्हालाच गुन्हेगार ठरवतील !

राज्यपाल धनखड यांनी प्रत्येक पीडिताला विचारले की, तुम्ही पोलिसांकडे का नाही जात ? तेव्हा एक पीडित म्हणाला, ‘‘आम्ही पोलिसात तक्रारदार म्हणून जाऊ; पण पोलीस आम्हाला गुन्हेगार म्हणून परत पाठतील (आमच्यावर गुन्हे प्रविष्ट करतील). एवढ्यावरच हे थांबणार नाहीत. आम्ही पोलिसात जाऊन आल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे लोक आमच्याशी काय करतील, हे सांगू शकत नाही.’’

जनता पोलिसांना घाबरते आणि पोलीस सत्ताधारी पक्षाच्या लोकांना घाबरतात. अशा व्यवस्थेला लोकशाही व्यवस्था म्हणू शकत नाही. कुचबिहारमधील लहान मुले मला म्हणाली, ‘‘सर, ते पुन्हा येतील !’’ त्यांच्या डोळ्यांमधील वेदना मी विसरू शकत नाही. मी जे ऐकले त्यांपैकी आपल्याला अतिशय थोडी माहिती सांगत आहे; कारण मला कुणाच्या भावना भडकवायच्या नाहीत.’’

तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मतदान केल्यानंतर हिंदूंना धर्मांतराचा धोका !

काही पीडितांनी, ‘लोकशाहीमध्ये स्वत:च्या इच्छेनुसार मतदान करायचे असते; मात्र येथे तसे केल्याने मिळणार असलेल्या ‘शिक्षे’पासून वाचण्यासाठी, ‘आम्ही धर्मांतर करण्यासाठी सिद्ध आहोत. तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा आणि तुम्ही आम्हाला आश्‍वासन द्या की, धर्मांतर केल्याने आमचा जीव वाचेल !’, अशा शब्दांत व्यथा मांडली. ही गोष्ट माझ्यासमोर आली, तेव्हा मला अतिशय वाईट वाटले. आमची लोकशाही एवढी कमकुवत आहे का ? कि त्याला कुणीही छिन्नविछिन्न करावे आणि घटनात्मक यंत्रणा पार उद्ध्वस्त करावी ?