हरियाणा येथे दोन घोड्यांना ‘ग्लँडर्स’ या रोगाची लागण !

कोरोनाप्रमाणे याही रोगावर औषध नाही !

झज्जर (हरियाणा) – येथे दोन घोड्यांना ‘ग्लँडर्स’ (घोड्याच्या जबड्याखाली सूज येऊन त्याचा घसा आणि नाक यांत व्रण येतात) या रोगाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. याविषयी प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांमध्ये हिसार येथील ‘राष्ट्रीय अश्‍व अनुसंधान केंद्रा’त १४३ जातींच्या घोड्यांच्या चाचण्या करून त्यांचे नमूने पडताळण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल आले असून त्यात २ घोड्यांच्या चाचण्यांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले आहेत. जिल्हा पशूपालन विभागाने यास दुजोरा दिला आहे.

याविषयी जिल्हा पशूपालन विभागाचे उपसंचालक मनीष डबास म्हणाले, ‘‘ग्लँडर्स’ हा पशूंमध्ये आढळून येणारा अत्यंत घातक रोग आहे. कोरोनाप्रमाणेच याही आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. हा आजार झालेल्या प्राण्यांना मारून टाकण्यात येते. यासाठी कायद्यातील प्रावधानाचा आधार घेतला जातो. या रोगाची लागण झालेले पशू जेथे आढळतात, त्याच्या आजूबाजूच्या ५ किलोमीटरच्या परिसरातील जनावरांच्या चाचण्या केल्या जातात. ही घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व घोडे मालकांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.’’