‘श्री अन्नपूर्णा स्तोत्र पाठांतर स्पर्धे’त मुंबई येथील सनातनची बालसाधिका कु. योगिनी श्रीपाद सामंत (वय ७ वर्षे) हिचा प्रथम क्रमांक !

स्पर्धेतील सुयशासाठी कु. योगिनी श्रीपाद सामंत हिचे अभिनंदन !

कु. योगिनी श्रीपाद सामंत

मुंबई – संस्कृत सखी सभा, नागपूर यांच्याद्वारे श्री शंकराचार्य रचित ‘श्री अन्नपूर्णा स्तोत्र पाठांतर स्पर्धा’ ५ ते १४ वयोगटांमधील मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये प्रथम गटात (वय वर्षे पाच ते नऊ) विलेपार्ले, मुंबई येथील सनातनची बालसाधिका कु. योगिनी श्रीपाद सामंत (वय ७ वर्षे) हिचा प्रथम क्रमांक आला. योगिनी हिने आपल्या यशाचे श्रेय सर्वप्रथम देवाला आणि तिला स्पर्धेसाठी साहाय्य केलेल्यांना दिले. कु. योगिनी श्रीपाद सामंत हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.

स्पर्धेच्या परीक्षकांकडून कु. योगिनीचे कौतुक !

स्पर्धेच्या परीक्षक सौ. श्रद्धा कोटस्थळे यांनी कु. योगिनीचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘‘योगिनीची वेशभूषा चांगली होती. आवाजाची लय आणि नाद तसाच ठेवून अतिशय उत्कृष्ट चालीमध्ये शांतपणे अन् स्पष्टपणे योगिनीने सादरीकरण केले. या स्तोत्राचा भावही तिच्या तोंडवळ्यावर उमटलेला मला दिसला. यासाठी तिचे पुष्कळ अभिनंदन !’’

कु. योगिनीचा श्री अन्नपूर्णादेवीप्रती असलेला भाव !

स्तोत्राचे पाठांतर करतांना प्रारंभी ती ‘श्री अन्नपूर्णादेव्यै नमः ।’ हा जप करून देवीला प्रार्थनाही करत असे. पाठांतर करतांना तिला हातात भांडे (भाताने भरलेले) घेतलेल्या अन्नपूर्णामातेचे दर्शन होत असे. अंतिम पठणाच्या चित्रीकरणाच्या वेळी योगिनीने प्रार्थना केली, ‘हे अन्नपूर्णामाते, तूच माझ्याकडून हे संपूर्ण स्तोत्र म्हणून घे आणि शंकराचार्य महाराजांना तू जशी दिसली होतीस, तसेच मलाही दर्शन दे आणि त्यातून मला आनंद मिळू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’’ तेव्हा श्री अन्नपूर्णामाता तिला प्रसाद देतांना दिसली.