संभाजीनगर – ‘म्युकरमायकोसिस’ने अनेक लोक त्रस्त आहेत. त्यावरील उपचार ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची व्यय मर्यादा १ लाख ५० सहस्र रुपयांपर्यंत आहे; मात्र उपचाराचा व्यय त्यापेक्षा अधिक झाला, तरी तो ‘महात्मा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’त पात्र ठरवला जाईल’, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने २४ मे या दिवशी येथील खंडपिठात देण्यात आली. मागील सुनावणीत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी याविषयी प्रशासनाचे म्हणणे मागवले होते.
राज्यात १८ सहस्र ‘अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन्स’ उपलब्ध केली आहेत. अजून १ सहस्र रुग्णालये या योजनेतून जोडली जातील. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी नव्या उपचार पद्धतीची रचना केली जात आहे’, असेही प्रशासनाने न्यायालयात सांगितले. ‘राज्यशासनाने एक पोर्टल सिद्ध करून त्यावर प्रतिदिन उपचार आणि खाट यासंबंधी माहिती उपलब्ध करावी’, अशा सूचना खंडपिठाने दिल्या.