छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण
कोल्हापूर – गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले असून तो आक्षेपार्ह मजकूर लवकरात लवकर मागे घ्यावा. वाचकांपर्यंत चुकीची माहिती जाण्यापूर्वी पुस्तकाची प्रत मागे घ्यावी, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुस्तक प्रकाशित करणार्या संस्थेस पत्र लिहिले असून त्यात ही मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘ही सर्व पुस्तके शासनाने कह्यात घ्यावीत आणि या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. (हिंदूंसाठी आदर्शवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक, ते पुस्तक प्रकाशित करणारे प्रकाशक या सर्वांवर सरकारने तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान सर्वश्रुत असतांना केवळ विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा खोडसाळपणा करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचे संदर्भहीन लिखाण केले आहे. त्यामुळे या पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी घालावी.