त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

सोलापूर – त्यागपत्र देऊन आरक्षण मिळणार असेल, तर उद्याच देतो; पण खासदार होऊन मी काय केले आहे, तेही पहायला हवे. देहली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वात मोठी जयंती साजरी केली. खासदार आहे म्हणूनच रायगड प्राधिकरण होऊ शकले. इतिहासात पहिल्यांदाच किल्ल्यांचे संवर्धन चालू झाले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर काय मार्ग काढता येईल ? यासाठी समाजाचे मत जाणून घेऊन ते राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडे मांडण्यासाठी राज्याचा दौरा करत आहे, असे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सोलापुरात सांगितले.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोलापुरात शासकीय विश्रामगृहावर मराठा समाजातील नेत्यांसमवेत बैठक घेतली. त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली.

सौजन्य : सरकारनामा

खासदार छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारल्यावर मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यासाठी समाजाची भूमिका समजून घेण्यासाठी मी राज्याचा दौरा करत आहे. केंद्र अथवा राज्य यांच्या विरोधात माझा दौरा नाही. या दौर्‍याच्या कालावधीत मी कायदेतज्ञांना भेटत असून त्यांच्याशी संवाद साधत आहे. सरकारच्या हातात ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या राज्य सरकारने द्यायला हव्यात.’’