दळणवळण बंदीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथे हॉटेल चालकाला दंड

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे – येथील भवानी पेठेतील ‘हॉटेल मिलन’मध्ये ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था हॉटेल चालकाने केल्यामुळे महापालिकेने मालकाकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यभरात दळणवळणबंदी लागू असल्याने अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे; मात्र ‘हॉटेल मिलन’च्या मालकाने हॉटेलमध्येच ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ही माहिती मिळाल्यावर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी करून कारवाई केली. ‘अशी घटना पुन्हा घडल्यास उपाहारगृहाला टाळे ठोकले जाईल’, अशी समजही देण्यात आली.