नागपूर येथे शस्त्रकर्माद्वारे गायीच्या पोटातून काढला ८० किलो प्लास्टिक कचरा !

गोभक्त सुनील मानसिंगका यांच्या जागरूकतेमुळे गायीचा जीव वाचला !

प्लास्टिकच्या वापरावर सरकार बंदी कधी आणणार ?

गायीच्या पोटातून प्लास्टिक कचरा काढला.

नागपूर – येथील एका गायीच्या पोटातून जवळजवळ ८० किलो प्लास्टिक कचरा काढण्यात आला. महाल परिसरातील बडकस चौक येथे असलेले गोभक्त आणि विहिंपच्या गोरक्षा विभागाचे केंद्रीय मंत्री सुनील मानसिंगका यांच्या जागरूकतेमुळे गायीचे प्राण वाचले. (गायीकडे वेळीच लक्ष देऊन तिचे प्राण वाचवल्याविषयी सुनील मानसिंगका यांचे अभिनंदन ! – संपादक) 

१. सुनील मानसिंगका हे प्रतिदिन गायीला गोग्रास देतात. तसेच परिसरातील गायींकडे त्यांचे लक्ष असते. एका गायीचे पोट पुष्कळ फुगल्याचे त्यांच्या लक्षात आले. रवंथ केलेला चारा तिचे नाक आणि तोंड यांच्यावाटे बाहेर पडत होता.

२. सुनील मानसिंगका यांनी पशूवैद्यकाकडे नेऊन गायीला दाखवले, तर ‘पोटात जमा झालेल्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पोट फुगले असून शस्त्रकर्माद्वारे कचरा बाहेर काढता येईल’, असे त्यांनी सांगितले.

३. त्यानंतर गोरक्षण सभा, धंतोली येथील गोरक्षण सभेच्या पशूवैद्यकीय रुग्णालयात आधुनिक वैद्य मयूर काटे, त्यांचे सहकारी पशुधन पर्यवेक्षक शेखर मेश्राम आणि मुकेश चवरे यांनी शस्त्रकर्म करून ८० किलो प्लास्टिक पिशव्या गायीच्या पोटातून काढल्या. यासाठी गोरक्षण सभेचे हर्षल आर्वीकर, सुमित माईकर आणि आशिष कावळे यांचे सहकार्य लाभले.