सातारा, २४ मे (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’मुळे (काळी बुरशी) आतापर्यंत ३ जणांचे मृत्यू झाले असून सद्य:स्थितीत जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत; मात्र कोरोनासह ‘म्युकरमायकोसिस’शी लढण्यासाठी जिल्हा आरोग्ययंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आधुनिक वैद्य सुभाष चव्हाण यांनी दिली.
आधुनिक वैद्य सुभाष चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा संसर्ग अल्प झालेला नाही, तोपर्यंत ‘म्युकरमायकोसिस’ने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात ‘म्युकरमायकोसिस’चा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुख्य इमारतीमध्ये तळमजल्यावर ७ खाटांचे २ कक्ष ‘बायोप्सी’च्या सुविधेसह चालू करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांनाच विशेषत: उच्च मधुमेह असणार्या रुग्णांनाच काळ्या बुरशीची प्रामुख्याने लागण होत आहे. जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या २८ रुग्णांपैकी ९ रुग्ण जिल्हा रुग्णालयांत, तर १९ रुग्ण खासगी रुग्णालयात आहेत.