राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरला !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई – राज्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरत चालला आहे. ५० ते ६० सहस्रांपर्यंत पोचलेली रुग्णसंख्या आता ३० सहस्रांपर्यंत खाली आली आहे. मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. कोरोनाच्या २६ सहस्र १३३ नवीन रुग्णांचे २२ मे या दिवशी निदान झाले असून ६८२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कठोर निर्बंध, लसीकरणाचा वेग आणि आरोग्ययंत्रणेचे कठोर प्रयत्न यांमुळे रुग्णसंख्या अल्प झाली आहे. राज्यात २२ मेपर्यंत एकूण ५१ लाख ११ सहस्र ९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०४ टक्के झाले आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ८७ सहस्र ३०० इतकी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.५८ टक्के आहे. तर राज्यात सध्या ३ लाख ५२ सहस्र २४७ ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्ण आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत.

आजपर्यंत ३ कोटी २७ लाख २३ सहस्र ३६१ नमुने पडताळण्यात आले. यांपैकी ५५ लाख ५३ सहस्र २२५ (१६.९७ टक्के) नमुने ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ५५ सहस्र ७२९ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत, तर २२ सहस्र १०३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.