नागपूर – ‘काळ्या बुरशी’मुळे होणारा आजार म्हणजेच ‘म्युकरमायकोसिस’ हा सध्या जीवघेणा झाला आहे. रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास ‘म्युकरमायकोसिस’ हा आजारही बरा होऊ शकतो, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने विशेष काळजी घेतल्यास या आजाराला स्वत:पासून दूर ठेवणे शक्य आहे, अशी माहिती विदर्भ ई.एन्.टी.सी. संघटनेचे आणि ‘टास्क फोर्स’चे अध्यक्ष आधुनिक वैद्य प्रशांत निखाडे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘म्युकरमायकोसिस’च्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करत लोकजागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. या आजाराची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी नागरिकांना वैद्यकीय तज्ञांकडून उपदेश आणि मार्गदर्शन चालू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आधुनिक वैद्य प्रशांत निखाडे यांनी या जनजागृतीच्या मोहिमेत सहभाग घेत नागरिकांना या आजाराविषयी मार्गदर्शन केले आहे. यानंतर त्यांनी ‘म्युकरमायोसिस’ आजाराच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या ‘टास्क फोर्स’च्या सदस्यांची बैठक घेऊन आढावाही घेतला.
ते पुढे म्हणाले की, ‘म्युकरमायकोसिस’ हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा रोग वातावरणातून शरीरात येतो. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचाराच्या वेळी मधुमेह झाला किंवा व्याधीग्रस्त आजार असलेल्या रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चा संसर्ग दिसून येत आहे. ‘म्युकरमायकोसिस’ची लक्षणे आढळल्यानंतर उपचाराअंती रुग्णाने नियमित संतुलित आहाराचे सेवन केल्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केल्यास रुग्ण या बुरशीजन्य संसर्गाला दूर ठेऊ शकतो. याचसमवेत मातीकाम करणार्या शेतकर्यांना या बुरशीचा अधिक धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात काम करतांना शेतकर्यांनी ‘मास्क’, हातमोजे घालणे आवश्यक आहे.