पुणे – कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र राखीव कक्ष ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजना यांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन अधिक वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत व्हायला हवी. तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि लहान मुलांवरील उपचारांसंदर्भात प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध व्हायला हवीत. यासह लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी अग्नीशमन यंत्रणा तपासून त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे सांगत आगीचे लेखापरीक्षण करून न घेणार्या रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. ‘म्युकरमायकोसिस’वरील प्रभावी औषधांच्या पुरवठ्यामध्ये अपप्रकार होऊ नये, तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकार्यांकडे देण्यात येत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.