सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?

ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

संत-महात्मे यांया सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या महाभयंकर आपत्तींमध्ये स्वतःसह कुटुंबियांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असून यातून कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच ! मात्र देवाची कृपा होण्यासाठी आपण साधना केली पाहिजे. योग्य साधना कशी करावी, हे कळण्यासाठी सनातनच्या ‘साधना’ या ग्रंथमालिकेतील प्रत्येक ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; कारण ते अत्यंत उपयोगी आहेत. ‘सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?’ या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

ग्रंथाचे मनोगत

‘मनुष्याचे मन स्वभावतःच अस्थिर असते. एका ठिकाणी बसून घंटोन्घंटे (तासन्तास) नामजप करणे, ध्यानधारणा करणे यांसारख्या साधनाप्रकारांमध्ये मनाला एकाच ठिकाणी स्थिर करावे लागते. त्यामुळे या साधनाप्रकारांमध्ये सर्वसाधारण साधकाचे मन रमणे जरा कठीण असते. याउलट ‘सत्सेवा (सेवा)’ या साधनाप्रकारामध्ये शरीर आणि बुद्धी यांच्याकडून होणार्‍या विविध कर्मांमध्ये (उदा. अध्यात्मप्रसार करणे, ग्रंथासाठी लेखन करणे) साधकाचे मन रमणे तुलनेत सोपे असते. सेवेच्या माध्यमातून साधकाचे मन, बुद्धी आणि अहं यांचा ईश्‍वरचरणी लय लवकर होत असल्याने सेवेच्या माध्यमातून साधकाची आध्यात्मिक उन्नतीही लवकर होते. सेवा म्हणजे साधकांसाठी साधनेसाठीचा जणू प्राणवायूच !

ज्याप्रमाणे नामजप भावविध अंतःकरणापासून केला नाही, तर तो गुरु किंवा ईश्‍वर यांच्यापर्यंत पोचत नाही, त्याप्रमाणेच सेवा ही भावपूर्ण आणि परिपूर्ण केल्याविना ती गुरु किंवा ईश्‍वर यांच्यापर्यंत पोचत नाही. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण केली, तरच तिच्यातून चैतन्य मिळते, आध्यात्मिक उपाय होतात आणि आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने होते. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यामध्ये मनाच्या स्तरावर येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे दृष्टीकोन प्रस्तुत लघुग्रंथात दिले आहेत. सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण होण्यासह ती अधिक फलनिष्पत्तीदायी होण्यासाठी कृतीच्या स्तरावर कोणकोणते प्रयत्न करावेत, हेही लघुग्रंथात सांगितले आहे.

एकट्याने आपापली सेवा करणे सोपे असते; पण सहसाधकांच्या समवेत सेवा करणे काही साधकांना जरा कठीण वाटते. याचे कारण म्हणजे, यात सर्वांशी जुळवून घेऊन सेवा करावी लागते. असे उपयोगी पडणारे दृष्टीकोनही दिले आहेत.

व्यवहारातील कर्मे, समाजसेवा, राष्ट्रकार्य इत्यादीही ‘सत्सेवा’ समजून केले, तर त्यांचा आध्यात्मिक दृष्टीने लाभच होतो. यासाठी या लघुग्रंथातील विवेचन हे केवळ साधकांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येकासाठीच उपयुक्त आहे.

लघुग्रंथात सांगितलेले दृष्टीकोन किंवा प्रयत्न हे सनातनच्या साधकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेले असल्याने त्यांमध्ये ‘साधक’, असा उल्लेख आहे. असे असले, तरी ते दृष्टीकोन किंवा प्रयत्न सर्वांनाच उपयोगी पडणारे आहेत.

‘या लघुग्रंथाच्या अभ्यासाने सर्वांकडून सेवा चांगली होऊन त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होवो, तसेच समष्टी सेवेच्या माध्यमातून सर्वत्र अध्यात्माचा प्रसार होऊन संपूर्ण मानवसमाज आनंदी होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ – संकलक

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com