कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे कोरोनाचा प्रभाव न्यून करण्यासाठी ‘कोरोना देवी’ मंदिराची स्थापना

४८ दिवस चालणार महायज्ञ !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारची अधार्मिक कृती केली जात आहे. हिंदु राष्ट्रात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवली जाईल !

मंदिरात स्थापन करण्यात आलेली “कोरोना देवी” ची मूर्ती
हे चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. वस्तूस्थिती कळावी यासाठी चित्र प्रसिद्ध करत आहोत.

कोईम्बतूर (तमिळनाडू) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ‘कोरोनापासून वाचवण्यासाठी देवच साहाय्य करू शकतो’, या श्रद्धेने येथील स्थानिकांनी शहराच्या बाहेर ‘कोरोना देवी’चे मंदिर उभारले आहे. १०० वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीच्या वेळेस येथे प्लेग मरियम्मन मंदिराची स्थापना करण्यात आली होती. लोकांनी या देवीची आराधना चालू केली आणि त्यानंतर काही कालावधीनंतर प्लेगच्या साथीचा संसर्ग अल्प झाल्याचे येथील स्थानिक त्यांच्या पूर्वजांकडून ऐकल्याचे सांगतात. त्याच धर्तीवर आता हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे.

शहराच्या बाहेरील इरुगुरमधील कामत्विपुरी अधीनम नावाच्या मठाने या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिरात कोरोना देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती अडीच फूट उंचीची आहे. कोरोनापासून मुक्ती मिळावी म्हणून या ठिकाणी ४८ दिवसांच्या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.