साहाय्यापासून कुणीही वंचित रहाणार नाही ! – उद्धव ठाकरे

तौक्ते वादळाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा

मुंबई – तौक्ते चक्रीवादळाने नेमकी किती हानी केली आहे ? याविषयी पंचनामे पूर्ण होऊ द्या. संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित साहाय्य केले जाईल. कुणीही वंचित रहाणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर २१ मे या दिवशी उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी बैठकीत त्यांनी वादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीचा आढावा घेतला. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी चक्रीवादळात झालेल्या हानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

वादळामुळे जिल्ह्यातील १७ घरांची पूर्णत: हानी झाली असून ६ सहस्र ७६६ घरे अंशत: बाधित झाली आहेत. वादळामुळे जिल्ह्यातील १ सहस्र १०० शेतकर्‍यांची साधारण २ सहस्र ५०० हेक्टर भूमीतील पिकांची हानी झाली. १ सहस्र २३९ गावांतील विद्युतपुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. त्यांतील १ सहस्र १७९ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत् झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण यांनी दिली.

व्यासपिठाखाली आसंद्यांवर बसून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा !

मुख्यमंत्री येणार; म्हणून व्यासपीठ उभारण्यात आले होते; मात्र व्यासपिठावर न जाता उद्धव ठाकरे यांनी व्यासपिठाच्या खाली आसंद्या लावून साधेपणाने जिल्ह्यातील हानीग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना कुणीही पुष्पगुच्छ न देण्याची सूचना केली होती.