मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे असंवेदनशील आधुनिक वैद्य ! असे माणुसकीशून्य, लोभी आणि रुग्णांना लुबाडणारे आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त करून कारागृहात पाठवले पाहिजे आणि अशी रुग्णालये बंद केली पाहिजेत ! |
नांदेड – येथील गोदावरी रुग्णालयातील प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्ण अंकलेश पवार यांच्या मृत्यूनंतर केवळ पैसे लाटण्यासाठी ३ दिवस त्यांच्या मृत्यूची वार्ता नातेवाइकांपासून लपवून ठेवत त्यांच्यावर उपचार चालू असल्याचा आभास निर्माण केला. या काळात नातेवाइकांनीही धावपळ करत अनुमाने ९० सहस्र रुपये रुग्णालयात भरले. ‘आधुनिक वैद्यांनी रुग्ण मृत्यू झाल्याचे ३ दिवस लपवून ठेवले. इतकेच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे दाखवून रुग्णालयाने आमच्याकडून पैसे उकळले.
रुग्णाच्या उपचारांसाठीच्या ३ दिवसांच्या व्ययाची रक्कम आम्ही भरताच अवघ्या १ घंट्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले’, अशी व्यथा नातेवाइकांनी मांडली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणी अंकलेश पवार यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
या तक्रारीत शुभांगी पवार यांनी म्हटले आहे की,
१. त्यांचे पती शिक्षक अंकलेश पवार यांना ताप आणि खोकला असल्यामुळे त्यांना १६ एप्रिल या दिवशी गोदावरी रुग्णालयात भरती करण्यात आले.
२. या वेळी त्यांचा ‘सीटी स्कॅन स्कोअर ७’, तर ‘ऑक्सिजन मात्रा ९८’ वर होती. या वेळी शुभांगी यांनी रुग्णालयात ५० सहस्र रुपये ‘डिपॉझिट’ भरले. यानंतर अंकलेश यांची प्रकृती खालावत गेली.
३. २० एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्यांनी कोणतीही सूचना न देता अंकलेश यांना अतीदक्षता विभागात हलवले. २१ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्यांनी नातेवाइकांना ३५ सहस्र रुपये किमतीचे ‘टॉसिलिझुमॅब इंजेक्शन’ आणण्यास सांगितले. त्याच दिवशी रुग्णालयात पैसेही भरण्यास सांगितले.
४. नातेवाइकांनी रुग्णालयाकडे पैसे भरण्यासाठी मुदत मागितली असता रुग्णालयाने त्यांना ती दिली नाही. विनंतीनंतर आधुनिक वैद्यांनी मुदतवाढ दिली. त्यानुसार नातेवाइकांनी २४ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ ५० सहस्र रुपये आणि रोख ४० सहस्र रुपये, असे एकूण ९० सहस्र रुपये रुग्णालयात भरले. यानंतर ‘अंकलेश यांचे निधन झाले आहे’, असे आधुनिक वैद्यांनी दुपारी १२ वाजता कळवले. या वेळी मृतदेह आणि मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली असता रुग्णालयाने अंकलेश यांचा मृतदेह अन् त्यांचे तात्पुरत्या स्वरूपातील मृत्यू प्रमाणपत्र दिले.
मृत्यू प्रमाणपत्रावरून रुग्णाचा मृत्यू ३ दिवसांपूर्वीच झाल्याचे उघड !
या प्रकरणी अंकलेश पवार यांचे मेहुणे नितीन राठोड यांनी सांगितले की, अंकलेश यांच्या उपचारांसाठी आम्ही रुग्णालयाकडे एकूण १ लाख ४० सहस्र रुपये भरले होते. आम्हाला २५ एप्रिल या दिवशी अंकलेश यांचे मृत्यू प्रमाणपत्र दिले गेले. या प्रमाणपत्राची माझी बहीण शुभांगी पवार हिने पडताळणी केली. त्यात अंकलेश यांचा मृत्यू २१ एप्रिलला रात्री ११ वाजताच झाल्याचे उघड आले. यानंतर आम्ही अधिवक्ता शिवराज पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. त्यावर न्यायालयाने संबंधितांविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवण्याचा आदेश पोलिसांना दिला.
मूळ कागदपत्रे देण्यासाठीही ४० सहस्र रुपयांची मागणी !
२५ एप्रिल या दिवशी अंकलेश यांच्यावरील उपचारांची कागदपत्रे पडताळल्यावर त्यांचा मृत्यू २१ एप्रिलला रात्री ११ वाजता झाल्याचे समोर आले; परंतु गोदावरी रुग्णालयाने २४ एप्रिल या दिवशीपर्यंत वैद्यकीय आणि औषधोपचार यांचा व्यय घेतला. केवळ पैसे देणे बाकी होते, यासाठी आधुनिक वैद्यांनी २४ एप्रिल या दिवशी मृतदेह नातेवाइकांकडे दिला. २६ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्यांना मूळ कागदपत्रे आणि मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी प्रारंभी टाळाटाळ करत ४० सहस्र रुपये भरण्यास सांगितले. ‘तोपर्यंत कागदपत्रे मिळणार नाहीत’, असे रुग्णालयाने सांगितल्याचे शुभांगी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हाधिकार्यांकडून चौकशीचा आदेश !
‘जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार गोदावरी रुग्णालयातील या प्रकरणाची चौकशी करून लेखाधिकारी नीळकंठ पासंगे यांना अहवाल देण्यास सांगितले आहे’, असे अपर जिल्हाधिकारी के.आर्. परदेशी यांनी सांगितले.