प्रतिदिन १० कि.मी. पायी प्रवास करून रुग्णांची सेवा करणार्या संभाजीनगर येथील कोरोना योद्धा सुमन मोघे !
संभाजीनगर – येथील बिडकीन शासकीय रुग्णालयातील स्वच्छता कामगार सुमन मोघे या प्रतिदिन ‘घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर’, असे १० कि.मी.चे अंतर पायी सर करतात. या रुग्णालयात गेल्या ५ वर्षांपासून त्या काम करत आहेत. ‘कोरोनाच्या संकटात कोरोना योद्धे आपापल्या पद्धतीने देश आणि रुग्ण यांची सेवा करत आहेत. यात एक स्वच्छता कामगार असले, तरी मी कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. ईश्वराने यासाठी आपली निवड केली याचा आपल्याला अभिमान वाटतो’, असे मत सुमन मोघे यांनी व्यक्त केले.
कामाच्या ठिकाणापासून सुमन यांचे घर ५ किलोमीटर दूर आहे; मात्र जाण्या-येण्याची कोणतेही सोय नाही. कोरोनाच्या आधी तेथून ये-जा करणारे दुचाकीस्वार त्यांना साहाय्य करायचे; मात्र आता कोरोना रुग्णांना सेवा देत असल्याने लोक त्यांना सोडण्यासाठी घाबरतात. सुमन यांना त्याचे काहीच दुःख वाटत नाही. प्रतिदिन पहाटे उठून घरातील सर्व कामे करून त्या सकाळी ७ वाजता बाहेर पडतात. त्यांना क्वचितच विलंब होतो. कधी-कधी त्यांना भीतीही वाटते; पण हे आपले काम असून त्याविषयी अभिमान वाटत असल्याचे त्या पुन्हा सांगतात.