१. सनातन संस्थेच्या एका आश्रमाच्या परिसरातील सर्वांना भटक्या कुत्र्यांमुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागणे
‘सनातन संस्थेच्या एका आश्रमाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण पुष्कळ वाढल्यामुळे ये-जा करणार्या व्यक्तींना पुष्कळ त्रास होत आहे. हे कुत्रे आश्रमाच्या बाहेरील परिसरातून ये-जा करणार्यांच्या मागे लागतात. आश्रमात बाहेरून ये-जा करणार्या साधकांनाही कुत्र्यांच्या या दहशतीला सामोरे जावे लागले आहे. वयस्कर व्यक्तींना तर याचा पुष्कळ त्रास होत आहे. परिणामी दैनिक वितरण करणारे, परिसरात कामाला येणारे कामगार, पोस्टमन, इस्त्रीचे कपडे घेऊन येणारे इत्यादी लोक या परिसरात यायचे टाळू लागले आहेत. अनेकांनी याविषयी स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, ‘‘या कुत्र्यांना कुठेतरी नेऊन सोडा, अन्यथा आम्ही इकडे येणार नाही.’’ यांपैकी काही जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. अनेकांना चावण्याच्या प्रयत्नांत कुत्र्यांनी त्यांच्या विजारी पकडल्या; पण त्या व्यक्तींनी आरडाओरडा केल्याने त्यांचा बचाव झाला.
२. सर्वसामान्यांच्या जिवाशी गाठ असतांनाही त्याविषयी उदासीन रहाणारी प्रशासकीय यंत्रणा !
भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात ग्रामपंचायतीला कळवल्यानंतर त्यांनी ‘कुत्र्यांची समस्या सोडवणे आमच्या अधिकारात येत नाही; परंतु आम्ही या समस्येवर पंचायत समितीत चर्चा करतो’, असे सांगितले; मात्र पंचायत समितीकडूनही वरील समस्येचे निराकरण झाले नाही. त्यानंतर एका स्थानिक आमदारांकडे या समस्येविषयी बोलण्यासाठी गेल्यावर त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांची समस्या ऐकून घेतली आणि ‘यावर उपाय काढतो’, असे आश्वासन दिले. त्यांनी त्यांच्या सेवेकर्याला याविषयी पाठपुरावा करण्यास सांगितले. तेव्हा त्या सेवेकर्याने भटके कुत्रे पकडून नेण्यासाठी वाहनाला संपर्क करून तसे नियोजनही केले; मात्र प्रत्यक्षात पुढे काहीच कृती झाली नाही. याविषयी वाहन चालकाला संपर्क केल्यावर तो प्रत्येक वेळी ‘येतो’, इतकेच सांगत असे; परंतु या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी कोणतीही कृती झालेली नाही. प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांची समस्या साधारण वाटते; पण तिचे परिणाम गंभीर आहेत. सरकारने यावर निर्णयात्मक ठोस कृती करणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे.
३. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील जाचक कायदेशीर नियम
अ. समाजातील एखाद्या व्यक्तीने भटक्या कुत्र्यांविषयी गार्हाणे दिले; पण त्याच वेळी त्याच परिसरातील एखाद्या व्यक्तीने या कुत्र्यांना पकडून नेण्यास विरोध केला, तर पकडण्यात आलेल्या कुत्र्यांना सोडावे लागते.
आ. भटक्या कुत्र्यांना कुणी मारले किंवा कुणाच्या गाडीखाली कुत्र्याचा प्राण गेला, तर ६ मास (महिने) कारावास आणि २५ सहस्र रुपये दंड आकारला जाऊ शकतो. कायद्यात अशी तरतूद असल्याने अशा भटक्या कुत्र्यांना पकडण्यास कुणी पुढे सरसावत नाही.
आज प्रतिदिन असंख्य लोकांचा रस्त्यावर अपघात होऊन त्यांना इजा झालेली आपण पहात आहोत; पण भटक्या कुत्र्यांविषयी असलेले कायदे पाहून ‘मानवाचा प्राण या भटक्या कुत्र्यांहून अधिक मूल्यहीन झाला आहे’, असे वाटते.
४. भटक्या कुत्र्यांची समस्या ही या प्राण्यांतील तमोगुण वाढल्याचे द्योतक असणे
आजच्या वाढत्या रज-तमाच्या वातावरणाचा अशा प्रकारच्या प्राण्यांवर दिवसेंदिवस अधिक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या ही या प्राण्यांतील तमोगुण वाढल्याचेच द्योतक आहे. प्रत्यक्षात कुत्रा हा बहुगुणी प्राणी आहे; मात्र आज अधर्माचरणी मानवाच्या वाढत्या रज-तमात्मक वृत्तीला आळा घातला जात नाही, तर या भटक्या कुत्र्यांच्या वृत्तीवर कोण आळा घालणार ?
५. मानव सत्त्वगुणी झाल्यास त्याचा सर्व प्राणीमात्रांवर सकारात्मक परिणाम होणार असणे
आजच्या बिघडलेल्या मानवाला सुधारण्यासाठी त्याच्यातील सत्त्वगुणाची वृद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाला सुधारायचे असेल, तर त्याला धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्माचरणामुळे ‘मानवाने कसे वागले पाहिजे ? त्याची वैचारिक स्थिती कशी असली पाहिजे ?’, याविषयी तो सूज्ञ होतो. कृतीच्या स्तरावर होणारा चांगला (सात्त्विक) पालट वातावरणावरही प्रभाव पाडतो. साहजिकच शुद्ध वातावरणाचा या सृष्टीतील प्रत्येकच घटकावर परिणाम होतो. मानवातील सत्त्वगुण वाढल्यावर वातावरणातही पालट होईल आणि याचा सकारात्मक परिणाम सर्वच प्राणीमात्रावर दिसून येईल. हे पालटण्याची प्रक्रिया जरी अवघड दिसत असली, तरी अशक्य नक्कीच नाही. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून धर्माचरण करत जीवन व्यतीत केल्यास धर्माधिष्ठित राष्ट्र (सनातन धर्म राज्य) होण्यास वेळ लागणार नाही.
सनातन धर्म राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्याच नव्हे, तर प्रत्येक सामाजिक समस्येवर योग्य निर्णय तात्काळ घेतला जाईल !’
– एक साधक (१५.११.२०१७)