अनेक गरजू रुग्णांना रात्रीही नि:शुल्क साहाय्य !
नागपूर येथील रिक्शाचालक श्री. आनंद वर्धेवार यांच्या आदर्श कृतीतून इतरांनी बोध घ्यावा !
नागपूर – दळणवळण बंदीमुळे शहरातील अनेक रिक्शाचालक बेरोजगार झाले आहेत. या स्थितीत शहरातील रिक्शाचालक श्री. आनंद वर्धेवार यांनी स्वतःतील कल्पकतेने रिक्शाला रुग्णवाहिकेत पालटून ते गरजू रुग्णांना नि:शुल्क साहाय्य करत आहेत. (यातून कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची लुबाडणूक करणार्या रुग्णवाहिकेच्या चालकांनी बोध घेतला पाहिजे. – संपादक)
श्री. वर्धेवार गेल्या २५ दिवसांपासून रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी साहाय्य करत आहेत. खाट उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना विविध रुग्णालयांच्या चकरा माराव्या लागतात. प्राणवायू वेळेत न मिळाल्याने अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन श्री. वर्धेवार यांनी ‘विदर्भ ऑटोरिक्शा चालक फेडरेशन’चे विलास भालेकर, जावेद शेख, अशोक न्यायखोर यांच्याकडे साहाय्य मागितलेे. यापैकी एकाने प्राणवायू सिलेंडर उपलब्ध करून दिले.
कोणत्याही रुग्णाने ७३५०१७९४८४ या भ्रमणभाष क्रमांकावर साहाय्य मागितल्यास श्री. वर्धेवार क्षणाचाही विलंब न करता दिवसा किंवा रात्रीही रिक्शा घेऊन रुग्णाकडे पोचतात. आवश्यकता असल्यास रुग्णाला प्राणवायू सिलेंडरही लावतात. श्री. वर्धेवार यांच्या पत्नी पारडी येथील ‘भवानी मल्टिस्पेशालिटी’ रुग्णालयात ‘पॅथोलॉजी’ तंत्रज्ञ आहेत. त्यांनीही या कामासाठी त्यांना रुग्णालयातून साहाय्य मिळवून दिले. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनीही श्री. वर्धेवार यांच्या या समाजोपयोगी कामाचे कौतुक केले आहे.
‘‘कोरोनाच्या रुग्णांच्या साहाय्यासाठी कुणी पुढे येत नाही. या रुग्णांना रुग्णालयात हालवताiना कुठे खाट नाही, तर कुठे इतर समस्येमुळे काही दाखला मिळत नाही. यामुळे मी काहींना तडफडून मृत्यूमुखी होतांना पाहिले. त्यानंतर स्वतःच्या रिक्शात काही दानदात्यांच्या साहाय्याने प्राणवायूची सोय करत रुग्णांना आता नि:शुल्क सेवा देत आहे. सध्या सिलेंडर पुष्कळ मोठे असल्यास त्रास होतो; परंतु लहान सिलेंडरसाठीही प्रयत्न करत आहे.’’ – श्री. आनंद वर्धेवार, रिक्शाचालक, नागपूर. |