खरे ‘जागरण’ !

भारतासह जगभरात कोरोनाचा संसर्ग कुणामुळे झाला, हे अद्याप अधिकृतरित्या उघड होऊ शकलेले नाही. तरीही यामागे चीन आहे, हे तसे जगजाहीर आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी ज्या वेळी युरोप आणि अमेरिका येथे हाहाःकार माजला होता, त्या वेळी भारताची स्थिती चांगली होती. पहिले काही आठवडे, तर रुग्णसंख्या पूर्णतः आटोक्यात होती; मात्र देहलीतील निजामुद्दीन मरकजमधील तबलिगी जमातच्या प्रचारकांचे शिबिर होऊन ते देशभरात परत गेल्यावर अचानक कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा वाढू लागला. काही तबलिगींचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. त्यामुळे पोलिसांना मरकजवर कारवाई करत तेथील सर्व प्रचारकांना अलगीकरणात न्यावे लागले. यावरून मोठा वादही झाला. ‘तबलिगींमुळेच देशात कोरोनाचा संसर्ग वाढला’, असे प्रत्येक जण म्हणू लागला. यामुळे काही जण अपकीर्ती होत असल्याने न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने ‘असे म्हणणे अयोग्य आहे’, असा निकाल दिल्यावर सर्वच शांत झाले. यामुळे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी यांना आनंद झाला; मात्र ‘आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे’ अशा प्रकारच्या वृत्तीतून या पुरो(अधो)गाम्यांनी यावर्षी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचे काही रुग्ण सापडल्यावर काठी धोपटत ‘साप साप’ असे ओरडण्यास चालू केले. कुंभमेळ्यामुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे हवेत तीर मारल्याप्रमाणे आरोप करू लागले. तबलिगी यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या वर्षी लक्षात आली होती; मात्र कुंभमेळ्यामुळे देशातील कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली, असे एकही उदाहरण सप्रमाण कुणीही दाखवले नाही. ‘कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले असले, तरी त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला’, असे कुणीही सिद्ध केलेले नाही. ज्या राज्यांतून कुंभसाठी भाविक मोठ्या संख्येने गेलेले नाहीत, अशा उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गोवा, कर्नाटक येथे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला, त्याविषयी मात्र सर्वच जण गप्प आहेत. ज्या राज्यात कुंभमेळा होता, त्या उत्तराखंडमध्येही स्थिती नियंत्रणातच आहे, हेही येथे पहाणे आवश्यक आहे. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांना झोडपण्याची कुठलीही संधी न सोडणारे याविषयी मात्र मौन बाळगून आहेत. अनेक जन्महिंदूही कुंभमेळ्याच्या नावाने शंख करू लागले; मात्र ते वरील राज्यांतील रुग्णांच्या वाढीविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याचा वस्तूनिष्ठ विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न केला नाही, तो दैनिक ‘जागरण’ या हिंदी वृत्तपत्राने केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘कुंभमेळ्यामुळे देशात कोरोनाचा संसर्ग वाढला नाही’, हे ‘जागरण’ने समप्रमाण दाखवून दिले आहे. ‘जागरण’ने खरी शोधपत्रकारिता करत कुंभमेळ्यावर बोट दाखवणार्‍यांना उघडे पाडले आहे. ‘जागरण’ने ‘जागरणा’चे खरे कार्य पार पाडले आहे. पत्रकारिता कशी असावी ? याचा आदर्श त्याने समोर ठेवला आहे. पत्रकाराने जागे राहून जनतेला, समाजाला योग्य माहिती देण्यासह वस्तूस्थिती काय आहे ? हेही दाखवले पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काही थोड्याच दैनिकांनी किंवा पत्रकारांनी हे कार्य पार पाडले आहे. त्यातही काही वेळेस राजकीय लाभापोटी भांडवलदारांची वृत्तपत्रे राजकीय पक्षांना लक्ष्य करण्यासाठीही अशा प्रकारची शोधपत्रकारिता करत असतात. त्यात त्यांचा स्वार्थ असतो. काही वेळेस शोधपत्रकारितेच्या नावाखाली खोटी माहितीही दिली जाते. सध्याच्या वृत्तवाहिन्यांच्या काळात प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती देऊन काही गोष्टी उघड केल्या जातात; मात्र विश्‍लेषण करून नीरक्षीर पद्धतीने कार्य करण्याचे काम पुष्कळच अल्प दिसून येते.

राज्य प्रशासनाचा खोटेपणा !

‘जागरण’ने कुंभमेळ्यातून कोरोनाचा प्रसार झालाच नाही, हे दाखवतांना आकडेवारी दिली आहे. ती अद्यापतरी कुणी फेटाळल्याचे वृत्त नाही. कुंभमेळ्यामध्ये आलेले भाविक, साधू त्यांच्या घरी, आश्रम, मठ आदी ठिकाणी परत गेले, तेथे त्यांच्यामुळे अन्य लोकांना संसर्ग झाला, अशी आकडेवारी कुठल्याही राज्याने दिलेली नाही. ही राज्ये आता ‘जागरण’चे वृत्त खोटे आहे’, हे सप्रमाण दाखवून देण्याचे आव्हान स्वीकारतील का ? ज्या लोकांनी सामाजिक माध्यमांतून कुंभमेळ्यावर टीका करत तो तात्काळ थांबवण्याची मागणी केली, ते तरी ही आकडेवारी सप्रमाण फेटाळून दाखवतील का ? भारतात एखादी अफवा पसरायला वेळ लागत नाही. त्याची सत्य-असत्यता पडताळून पहाण्याची तसदी कुणी घेत नाही. पत्रकारांनी तरी अफवा पसरवू नये, असा अलिखित नियम आहे, तसेच हेच त्यांचे कर्तव्य आहे; मात्र अनेकांनी कुंभमेळ्यातून कोरोना पसरल्याची वृत्ते कुणा ना कुणाच्या हवाल्याने प्रसिद्ध केली. त्यांची शहानिशा करण्याची तसदी घेतली नाही. ‘जागरण’च्या पडताळणीतून उत्तराखंड प्रशासनाचाही खोटेपणा उघड झाला आहे. कुंभमेळ्याला ६५ ते ७० लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवल्याची आकडेवारी प्रशासनाकडून देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात ११ लाखांहून अधिक भाविक कुंभमेळ्यात पोचलेच नाहीत, हे ‘जागरण’ने दाखवून दिले आहे. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण द्यायला हवे अन्यथा प्रशासन खोटी माहिती देते, असेच समजावे लागेल. मुळात उत्तराखंड राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे जर प्रशासन चूक करत असेल आणि त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक उत्सवांची अपकीर्ती करण्यात येत असेल, तर ती अक्षम्य चूक समजायला हवी. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पहायला हवे.

पत्रकारांचे दायित्व !

‘देशात कोरोनाची दुसरी लाट असतांना कुंभमेळ्याचे आयोजन करायला हवे होते का ?’, ‘ते प्रातिनिधिक करता आले नसते का ?’ असे प्रश्‍न काही सुधारणावादी हिंदूंनी विचारले होते. ‘कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कुंभमेळा प्रातिनिधिक करावा’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केला होता. प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते, केवळ बागुलबुवा निर्माण करण्यात आला, हे ‘जागरण’मुळे स्पष्ट झाले. अशा प्रकारची पत्रकारिता आता करण्याची आवश्यकता आहे. जे सत्य आहे, ते शोधून समाजासमोर पुढे आणले पाहिजे. तरच ती खरी पत्रकारिता होऊ शकते. पत्रकारांना ‘संजय’ची उपमा दिली जाते. ते पहाता पत्रकारांनी, दैनिकांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. आज देशात सहस्रावधी दैनिके आहेत; मात्र त्यातील केवळ एका ‘जागरण’ने सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, हे भारतीय पत्रकारितेला शोभणारे नक्कीच नाही !