पाकमधूनच तालिबानला संचालित केले जात असल्याने पाकनेच शांततेसाठी प्रयत्न करावेत ! – अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

(डावीकडे) अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी

काबूल (अफगाणिस्तान) – तालिबानची संपूर्ण व्यवस्था पाकिस्तानमधूनच संचालित होते. पाक त्याच्या देशात तालिबानच्या सर्व गरजा पुरवत आहे. त्याला अर्थसाहाय्य करत आहे. इतकेच नव्हे, तर तालिबानमध्ये आतंकवाद्यांची भरतीही पाकमधूनच होते. त्यामुळे आता पाकनेच तालिबानसमवेतच्या शांततेची चर्चा पूर्ण करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी केले आहे.

राष्ट्रपती गनी यांनी पुढे म्हटले की, तालिबानवर पाकचाच पूर्ण प्रभाव आहे. पाकनेच तालिबानसाठी संघटित प्रणाली विकसित केली आहे. तालिबानचे निर्णय घेणार्‍या सर्व संस्था पाकमध्येच आहेत. त्यांना पाक सरकारचे समर्थन आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी अमेरिकेची भूमिका मर्यादित आहे. अशा वेळी पाकने तालिबानवर दबाव निर्माण करून शांतता स्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.