ब्राह्मण महासंघ स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोहीम राबविणार !
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान केले पाहिजे; मात्र ते करत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे, तसेच हिंदुत्वाचा व्यापक अर्थ आणि हिंदुत्वाची व्यापक व्याख्या लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. ब्राह्मण महासंघाच्या वतीने क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने पौरोहित्य करणार्या गरजू ब्राह्मणांना १५ मे या दिवशी किराणा साहित्य देण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंद दवे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातच नव्हे तर ब्राह्मण समाजातील शहरी भागातील अनेक कुटुंबांची परिस्थिती हलाखीची असून त्यांच्या उत्थानासाठी ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मांडली. मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनने ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हे ब्रीद अंगीकारले असून समाजातील सर्व स्तरांतील गरजूंना या संकटकाळात साहाय्य करत असल्याचेही संदीप खर्डेकर म्हणाले.