गोव्यात २ मृत्यू, सहस्रो झाडे उन्मळून पडली, बहुतांश भागांत वीजपुरवठा खंडित, वाहतुकीचा खोळंबा
पणजी/सिंधुदुर्ग – हवामान खात्याने दिलेल्या चेतावणीनुसार १६ मे या दिवशी आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांना बसला. सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पाऊस यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले.
गोवा – राज्यात १६ मे या दिवशी ताशी १०० कि.मी. वेगाने वहाणारे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. राज्यात सहस्रो झाडे उन्मळून पडली, शेकडो वीजखांब मोडल्याने राज्यातील बहुतांश भागांत वीजपुरवठा खंडित झाला आणि पाणी साठल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. राज्यातील १५० घरांना हानी पोचली. पणजी शहरातही पाणी तुंबले होते. हणजूण येथे अंगावर झाड पडल्याने १ महिला जागीच ठार झाली. समुद्राला आलेल्या उधाणामुळे समुद्रकिनारपट्टीवर हानी झाली. चक्रीवादळामुळे रस्ता, रेल्वे आणि विमान वाहतूक यांवरही परिणाम झाला. गोव्यात येणारी आणि जाणारी सर्व विमाने रहित करण्यात आली.
चक्रीवादळ गोव्यापासून १०० कि.मी. अंतरावरून पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ दमण आणि दीव, तसेच दादरा नगरहवेली येथून पुढे १८ मे या दिवशी सकाळी गुजरात राज्याला धडक देणार आहे.
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरे, गोठे, आंबा, काजू यांसह विविध प्रकारची झाडे यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. यामुळे वीजपुरवठ्यासह वाहतुकीवरही परिणाम झाला. या वादळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या वादळामुळे लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सावधानतेचा उपाय म्हणून किनारपट्टीवरील एकूण १४४ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात ४४७ घरे, ३७ गोठे, ३ शाळा, १० शेड, १४ शासकीय इमारती, २३ विद्युत् खांब आणि २ विद्युत वाहिन्या यांची हानी झाली आहे. १४३ ठिकाणी झाडे पडली आहेत, अशी प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे.
वादळ रत्नागिरीकडे सरकले असले, तरी धोका कायम ! – जिल्हा प्रशासन
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – वादळ रत्नागिरीकडे सरकले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धोका अजून टळलेला नाही. रस्त्यावर पडलेली झाडे काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू आहे.
विद्युत् वितरण विभागाची या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. १७ मे या दिवशी प्रतिघंटा ७० ते ८० कि.मी. वेगाने वारे वहाणार आहेत, तर मालवण ते वसई या समुद्रकिनार्यावर रात्री ११.३० वाजेपर्यंत ३.३ मीटर ते ६.२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तसेच वेंगुर्ला ते वास्को या किनारपट्टीवर लाटांची उंची ३.२ मीटर ते ६ मीटर इतकी असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी, तसेच मासेमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच समुद्राच्या जवळ लाटा पहाण्यासाठी उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा चांगला परिणाम
१६ मे या दिवशी सकाळी जिल्ह्याच्या समुद्रात दाखल झालेले चक्रीवादळ दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकले. जिल्ह्यात अनुमाने ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वहात होते. या काळात जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या सर्व सावधानतेमुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. १६ मे या दिवशी दुपारपर्यंत एकूण ९४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरचा विद्युत् पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. रत्नागिरी आणि कोल्हापूर येथून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा या काळात सुरळीत ठेवण्यात आला होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.