सावंतवाडी – तिलारी धरण कालव्याचे काम चालू होऊन ४० वर्षांचा कालावधी लोटला तरीही प्रकल्पबाधित गावांना अद्याप पाणी मिळाले नाही. कालव्याचे काम कासवगतीने चालू असून हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे. संबंधित विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम करतात. कालव्याच्या कामाची गती पहाता ठेकेदारांकडून मिळणार्या टक्केवारीसाठी हे काम चालू असल्याचा आरोप रोणापालचे सरपंच सुरेश गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. २५ मेपर्यंत कालव्यातून रोणापाल गावापर्यंत पाणी न आल्यास प्रखर आंदोलन करण्याची चेतावणी गावडे यांनी दिली आहे.
या पत्रकात गावडे म्हणतात की, मुबलक पाणी मिळण्याच्या आशेने प्रकल्पबाधित गावातील शेतकर्यांनी आपल्या भूमी कवडीमोल दराने कालवा प्रकल्पासाठी दिल्या. रोणापाल, निगुडे, मडुरा, शेर्ला, कास, सातोसे या गावांचा समावेश तिलारी हरितपट्ट्यात करण्यात आला. त्यामुळे कोणत्याही पद्घतीने भूमी हस्तांतरण करणे, कर्ज काढणे, लागवड करणे, सहकारी संस्थांकडे काम असल्यास, तसेच बिनशेती करायची असल्यास आणि अशा प्रकारच्या अनेक कामांसाठी तिलारी कार्यालयाचा ‘ना हरकत’ दाखला अनिवार्य झाला. भविष्यात पाणी मिळण्याच्या आशेने शेतकर्यांनी सर्व सहन केले; मात्र कालव्याच्या कामाची गुणवत्ता आणि गती पहाता पाणी मिळणे दुरापास्तच आहे. ४ मासांपूर्वी चराठे येथील तिलारी कार्यालयात माझ्यासह प्रकाश वालावलकर, अरुण पंडित, निगुडे सरपंच समीर गावडे, इन्सुलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, रवींद्र म्हापसेकर यांनी अधिकार्यांची भेट घेऊन विचारणा केली. त्या वेळी १५ मेपर्यंत रोणापाल गावापर्यंत पाणी येईल, असे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कालव्याचे पाणी आलेले नाही.
तिलारी कालव्याचा कारभार पहाता ही योजना तिलारी विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी आहे कि भूमी दिलेल्या शेतकर्यांसाठी आहे ? असा प्रश्न उभा रहातो. ठेकेदारांकडून मिळणार्या टक्केवारीसाठी ३ दशके हा कारभार चालू असल्याचा गंभीर आरोप गावडे यांनी केला आहे.