चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर मासेमार आणि प्रशासन यांनी सतर्क रहाण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

जिल्हाधिकार्‍यांकडून किनारपट्टी भागाची पहाणी  किनारपट्टीवर ३ क्रमांकाचा बावटा लावला

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळ जिल्ह्याच्या समुद्रात १६ मे या दिवशी पहाटे पोचेल. त्यामुळे या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहावे. त्यानंतर ते जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील नागरिक, मासेमार आणि प्रशासन यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून किनारपट्टीची पहाणी

मालवण – चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी १५ मे या दिवशी येथील किनारपट्टीची पहाणी करून मासेमार आणि स्थानिक नागरिक यांना सावधानतेच्या सूचना दिल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रशासन यांना सज्ज अन् सतर्क रहाण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या वेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

समुद्र किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढली

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवर समुद्राच्या भरतीचे पाणी नेहमीपेक्षा वाढले होते. त्यामुळे मासेमारांकडून किनारपट्टीवर असलेल्या नौका आणि साहित्य यांची अधिक दक्षता घेतली जात होती. बंदर विभागाने धोक्याची सूचना देणारा ३ क्रमांकाचा बावटा लावला आहे. मालवण, वेंगुर्ला येथील समुद्रकिनार्‍यावरील लोकांना याचा फटका बसला.

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर कणकवली आणि मालवण नगरपालिकांची पथके तैनात 

कणकवली – चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण होणार्‍या संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कणकवली पोलीस प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. कणकवली पोलिसांनी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी वरवडे येथील नदीपात्रात ‘जेमिनी क्राफ्ट’ बोटीचे प्रात्यक्षिक घेतले.

वादळाचा कणकवली शहराला असलेला संभाव्य धोका लक्षात घेत नगरपंचायतीने शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर त्याचा सामना करण्याकरिता १२ कर्मचार्‍यांचे पथक तैनात केले आहे.

मालवण नगरपालिकेनेही अत्यावश्यक साहित्यासह खास पथकाची नियुक्ती केली आहे. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी शहरातील किनारपट्टी भागाची पहाणी केली. शहरात पावसाचे पाणी तुंबू नये, यासाठी गटाराची स्वच्छता करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास, नगरपालिकेच्या इमारती आणि काही शाळांतून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग – चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यात १४ मेच्या मध्यरात्री मेघगर्जना आणि वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून हानी झाली, तर एके ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत् मीटर आणि दूरदर्शन संच जळला. मांडवी खाडीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, तसेच बंदर परिसरात मोठ्या लाटा उसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आंबोली आणि भुईबावडा परिसरात १५ मे या दिवशी दुपारी मुसळधार पाऊस पडला.