नगर, १३ मे – इतर कायम कर्मचार्यांप्रमाणे ४५ सहस्र रुपये वेतन आणि समान काम मिळावे, परिचारिकांच्या परिवाराला विमा संरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्यांसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालय आणि साईबाबा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या १९० कंत्राटी परिचारिकांनी १२ मे या दिवशी रुग्णालयाबाहेर काम बंद करून ठिय्या आंदोलन चालू केले होते; पण ‘साथ रोग नियंत्रण कायदा’ लागू असल्याने आंदोलन करता येणार नाही, असे सांगत मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना बळजोरीने ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढले. ‘परिचारिकादिनी’च मागण्या ऐकून न घेता आंदोलकांना ताब्यात घेणार्या रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा परिचारिका संघटनेसह अन्य नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.
या प्रमुख मागण्यांसाठी परिचारिकांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलने केली आहेत, तसेच या रुग्णालयात कोविड सेंटरही चालू आहे. त्यामुळे कामाचा ताण अधिक वाढला आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही साईबाबा संस्थानच्या प्रशासनाकडून त्यावर तोडगा काढलेला नसल्यामुळे काम बंद आंदोलन केल्याचे परिचारिका संघटनेकडून सांगण्यात आले.
पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी तो फेटाळून लावला असून अवैध आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलकांना रितसर ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.