ठाणे – देशाच्या सैन्यासाठी शस्त्र आणि इतर सामग्री सिद्ध करणार्या आयुध निर्माण कारखान्यात (ऑर्डनन्स फॅक्टरीत) हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे यंत्र बनवण्यात आले आहे. कारखान्याच्या एमपीटीएफ् विभागात सैन्य आणि नौदल यांच्यासाठी लागणार्या वाहनांचे भाग, तसेच इतर अनेक संवेदनशील संरक्षणात्मक सामग्री बनवली जाते. तेथे हे यंत्र बनवण्यात आले आहे.
मागील वर्षी देशात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असतांना या कारखान्याने व्हेंटिलेटर्स आणि सॅनिटायझर यांचीसुद्धा निर्मिती केली होती, तर या वर्षी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या कारखान्याने ऑक्सिजननिर्मिती करणारे यंत्र बनवले गेले आहे. कारखान्यात नायट्रोजन गॅस सिद्ध करण्याची २ यंत्रे यापूर्वी कार्यरत होती, त्यापैकीच एका यंत्रामध्ये पालट करून हे ऑक्सिजन यंत्र बनवण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात काही दिवसांत एक कोविड रुग्णालय चालू होणार असून त्यात हे यंत्र बसवले जाणार आहे. या यंत्राद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करून थेट रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पोचवला जाईल. हे यंत्र दिवसाला ४८ सहस्र लिटर्स ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे.