ठाणे, ११ मे (वार्ता.) – येथे ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराची पहिली रुग्ण महिला आढळली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणार्या ५६ वर्षीय एका महिलेच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. त्याची गांभीर्याने नोंद घेत तिच्या काही चाचण्या केल्या असता महिलेला ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराची लागण झाल्याच लक्षात आले. महिलेचे सिटीस्कॅन, ओर्बिटब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्या वेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मांसपेशींना, तसेच सायनसमध्ये सूज असल्याचे चाचणी अहवालात दिसून आले. या महिलेला पुढील उपचारांसाठी मुंबई येथील शीव रुग्णालयात हालवण्यात येत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.
कोरोनामध्ये रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या रुग्णांमध्ये ‘म्यूकरमायकोसिस’ नावाचा आजार आढळून येत आहे. हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ; पण अत्यंत घातक संसर्ग आहे. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही, तर, मेंदू, हिरड्या, छाती तसेच शरिरात कुठेही होऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. तसेच या आजाराचे प्रमाण वाढण्याची भीतीही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
म्युकरमायकोसिसची लक्षणे
वरच्या पापणीला सूज येणे, ती खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज येणे, नाक बुजणे, तोंडावर एका बाजूने सूज येणे, डोळ्यांमध्ये वेदना होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. कोरोना वाढल्यास ‘अॅन्टिव्हायरल’ आणि ‘स्टेरॉईड’ द्यावेच लागतात. या औषधांनी रोगप्रतिकारकशक्ती अल्प होते. त्यामुळे कोरोनानंतर हे संक्रमण होते.