कृषी कायद्याविरोधात देहलीच्या टीकरी सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या तंबूमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

याविषयी शेतकरी संघटना गप्प का ? त्यांचे आंदोलन भरकटले आहे, असे समजायचे का ?

सोनीपत (हरियाणा) – येथील देहलीच्या टीकरी सीमेवर गेल्या काही मासांपासून शेतकर्‍यांकडून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन चालू आहे. येथे शेतकरी रस्त्यावर तंबू ठोकून रहात आहेत. येथे काही दिवसांपूर्वी आंदोलनासाठी बंगालमधून आलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या तरुणीचा नंतर मृत्यू झाला. या संदर्भात पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

ही तरुणी ११ एप्रिल या दिवशी येथे आली होती. ती येथील ‘किसान सोशल आर्मी’च्या तंबूमध्ये थांबली होती. तेथेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिने अनूप आणि अनिल या दोघांची नावे घेतली आहेत. पोलिसांनी मात्र अन्य ४ जणांविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे. यास या तरुणीच्या वडिलांनी विरोध केला आहे. ‘या ४ मध्ये २ तरुणी असून त्यांनी पीडित तरुणीला साहाय्यच केले होते’, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.