पाटलीपुत्र (बिहार) येथे एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताच्या समोरच त्याच्या पत्नीचा विनयभंग

रुग्णालयाकडून ऑक्सिजनचा काळाबाजार करण्यात येत असल्याचा आरोप

बिहार सरकारने या आरोपांची चौकशी करून सत्य समोर आणावे !

पाटलीपुत्र (बिहार) – येथे एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पतीला कोरोनामुळे भरती करण्यात आले होते. येथे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. या महिलेने अधिक पैसे देऊन ऑक्सिजन खरेदीही केले; मात्र तिचा पती वाचू शकला नाही. त्याचे कोरोनामुळे निधन झाले. याला रुग्णालयाची दायित्वशून्यताही कारणीभूत आहे, असा आरोप या महिलेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. ‘रुग्णालयात पतीच्या समवेत असतांना पतीसमोरच माझा रुग्णालयातील डॉक्टर आणि काही कर्मचारी यांंनी विनयभंगही केला’, असा आरोप तिने केला आहे. पत्नीचा विनयभंग होत असतांना पतीही काही करू शकत नव्हता, असेही तिने या वेळी सांगितले.

१. या महिलेने सांगितले की, पतीला ९ एप्रिलला ताप आल्याने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या वेळी ती त्याच्या समेवत होती. तेव्हा रुग्णालयातील एका कर्मचार्‍याने तिचा विनयभंग केला. पतीची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला अन्य एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. तेथे अनेक रुग्णांचा मृत्यू होत होता. एक रुग्ण डॉक्टरांना हाक मारत खाली कोसळला. त्याचे डोके फुटले; मात्र कुणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. डॉक्टर आणि परिचारिका भ्रमणभाषवर चित्रपट पहात होते, असा आरोपही तिने केला.

२. या महिलेच्या बहिणीनेही आरोप करतांना म्हटले की, माझ्या बहिणीकडे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वाईट नजरने पहात होते. अनेकदा त्यांनी तिच्या शरिराला हात लावण्याचाही प्रयत्न केला. रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे सांगत स्वत: रुग्णालय ५० सहस्र रुपयांना ऑक्सिजन सिंलिंडर विकत होते.